भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य अनुष्ठान ये तीर्थीं । त्याचे पूर्वज उद्धरिती

nitya anushthan ye tirthin | tyache purvaj uddhariti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नित्य अनुष्ठान ये तीर्थीं । त्याचे पूर्वज उद्धरिती । जे कां अन्नदान करिती । ते पार्वती वैकुंठीं ॥१॥ ऐसें तीर्थक्षेत्र सर्वोत्तम । आणिक नाहीं यासी सम । शिवपीठ हें मनोरम । आळंकापुरीं हें देख ॥२॥ न वर्णवे येथिंची थोरी । जेथें साक्षात श्रीहरि । येऊनियां झडकरी । ज्ञानदेवा समाधि दिधली ॥३॥ अनंत पुण्य ज्याचें गांठीं । तरीच ज्ञानदेव पडे दिठी । जोडे तप कोट्यानुकोती । ऐसे धूर्जटी बोलिले ॥४॥ सिद्ध साधकांचे स्थळ । सर्व तीर्थाचें हेंचि मूळ । वास केलिया सर्वकाळ । तरी महादोष हरतील ॥५॥ अजान वृक्षातळीं हरिकथा । नित्य जो नर करी तत्वतां । तो न जाय यमपंथा । ऐसें जगन्नाथ बोलिले ॥६॥ द्वारीं सुवर्णाचा अश्वत्थ । नित्य पूजलिया स्वस्थ । लक्ष्मी न सांडी तया सत्य । सकळ आर्ती पूर्ण होती ॥७॥ नित्य प्रदक्षिणा सप्त । तरी अगाध पुण्य त्वरित । पूर्वज्क वैकुंठासी जात । बेचाळिसां सहित ॥८॥ नित्य विष्णूचें पूजन । नित्य नाम संकीर्तन । नित्य वैष्णव संत भोजन । धन्य पावन इहलोकीं ॥९॥ नामा म्हणे आळंकापूर । सर्व क्षेत्रामाजीं मनोहर । पवित्रासी परम परिकर । त्रिभुवनीं दुर्लभ ॥१०॥