भजनी मालिका
← भजनांकडे परत

निशीं प्राप्त होतां भ्रताराचे शेजे । गोपिका ती निजे आनंदानें

nishin prapta hotan bhratarache sheje | gopika ti nije anandanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निशीं प्राप्त होतां भ्रताराचे शेजे । गोपिका ती निजे आनंदानें ॥१॥ संधी पाहोनियां प्रवेशला देव । करीत लाघव काय तेव्हां ॥२॥ भ्रताराचे दाढी कांतेची ते वेणी । एकत्र करोनी ग्रंथी देत ॥३॥ करूनि कौतुक निघोनियां गेला । अरुणोदय झाला तये-वेळीं ॥४॥ गोदोहनालागीं गोपी ते उठत । वेणी आंसडीत दाढी-संगें ॥५॥ भ्रतारासी तेव्हां बोले ते कामिनी । न धाय अजूनि मन कैसें ॥६॥ भ्रताराची दाढी ओढितांचि जाण । सक्रोध होऊन बोल-तसे ॥७॥ मस्त होवोनियां माजली धांगडी । करिती ओढाओढी मजलागीं ॥८॥ नामा ह्मणे तेव्हां उठोनी बैसती । आश्चर्य करिसी मनामाजी ॥९॥