भजनी मालिका
← भजनांकडे परत

नंद ह्मणे माझें बुडालें जहाज । अभाग्यासी मज कृष्ण कैचा

nand hmane majhen budalen jahaj | abhagyasi maj krushna kaicha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नंद ह्मणे माझें बुडालें जहाज । अभाग्यासी मज कृष्ण कैचा ॥१॥ काय माझें तप संपूर्ण सरलें । ह्मणोनी बुडालें तान्हें माझें ॥२॥ चिंतेनें व्याकूळ पिटी वक्षस्थळा । दावरे सांवळा प्राण माझा ॥३॥ आलिया अतीता त्रासें दवडीलें । ह्मणोनी बुडालें बाळ माझें ॥४॥ प्रात:काळीं पाहूं कोणाचें मी मूख । येथुनियां सुख नाहीं नाहीं ॥५॥ समस्तांची दृष्टी करी तुज कष्टी । ह्मणोनी जगजेठी ठाकियलें ॥६॥ गोकुळींचे जन देऊं पाहाती प्राण । वा-चाया कारण काय आतां ॥७॥ अभय देतसे बळिभद्र सर्वांसी । मारून दुष्टांसी येईल आतां ॥८॥ अंतर्यामीं जाणे जन झाले वेडे । नामा ह्मणे वेढे काढितसे ॥९॥