भजनी मालिका
← भजनांकडे परत

नानागंधें तुलसीमाळा । वैष्णवीं घातलिया गळां

nanagandhen tulasimala | vaishnavin ghataliya galan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नानागंधें तुलसीमाळा । वैष्णवीं घातलिया गळां । नमस्कार करीती गोपाळा । चरणरजा वंदिती ॥१॥ दोहीं बाहीं देव्हडे । संत सनकादिक गाढे । जयजयकार पुढें । महाशब्दें गर्जिन्नले ॥२॥ ऐसे इंद्रायणीचां तटीं । हरि रुक्मिणी जगजेठी । संत सनकादिकांची गोमटी । मांदी मिळाली असे ॥३॥ तंव पुंडरिकें नमस्कार केला । म्हणे तूं कां गा येथें विठो उगवला । बहुत दिवस येथेंचि राहिला । या ज्ञानेदेवाकारणें ॥४॥ तरी पंढरीहुनि हे श्रेष्ठ । तूं येथें उभा अससी प्रगट । भूमी उतरलें वैकुंठ । ज्ञानदेवाकारणें ॥५॥ बहुत दिवस येथेंचि जाले । मी न देखें विटेवरी जंव पाउलें । तंव नयन माझें भुकेले । न राहाती देवराया ॥६॥ देव म्हणती पुंडरिका । तूं भक्त माझा निजसखा । आणि हा ज्ञानदेव देखा । दुजा न देखोम आणिक ॥७॥ हें संत सनकादिक माझे । यांचेनि समागमें माझें बीजें । नामा डौरिन्नला यांचे चरणरजें । मग जावों रे पंढरीसी ॥८॥