भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाचे घरीं असे दासी जनी । तिनें चक्रपाणी वश केला

namayache gharin ase dasi jani | tinen chakrapani vash kela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामयाचे घरीं असे दासी जनी । तिनें चक्रपाणी वश केला ॥१॥ करितां कामधंदा ध्यानीं नारायण । करीत चिंतन अहोरात्न ॥२॥ देखोनियां भाव तिचा पांडुरंग । काम करूं लागे जनीलागीं ॥३॥ रात्रीं येऊनियां जनीचिया घरीं । दळूं लागे हरी तिजलागीं ॥४॥ दळितां काढिली माळ विजयंती । ठेविली परती शालजोडी ॥५॥ जनीचें आवडे देवाजीस गाणें । झालासे तल्लिन पांडुरंग ॥६॥ प्रात:काळ झाला तेव्हां त्या समयासी । जात हृषिकेशी तांतडीनें ॥७॥ घेऊनियां गेले जनीची वाकळ । विसरले माळ शाल जोडी ॥८॥ तेव्हां पुजार्‍यानेंज उघडिलें द्वार । पाहिला तो वर रुवक्मिणीचा ॥९॥ देवाच्या अंगावर देखिली वाकळ । नाहीं गळां माळ शालजोडी ॥१०॥ एकमेकां तेव्हां पुसती पुजारी । कोणें केली चोरी देवाजीची ॥११॥ शोध करितांना जनीची वाकळ । आले ते सकळ तिच्या घरीं ॥१२॥ शालजोडी माळ होती तिचे घरीं । दाविती पुजारी सर्वांलागीं ॥१३॥ बांधियेली तेव्हां त्यांनीं दासी जनी । नामया लागुनी श्रुत केलें ॥१४॥ नामा म्हणे जने कांगे केली चोरी । बोलतसे खरें जनी त्यासी ॥१५॥ रात्नी माझ्या घरा आले पांडुरंग । दळितां श्रीरंगा घाम आला ॥१६॥ काढियेली माळ तेव्हां शालजोडी । गातसे आवडी मजसवें ॥१७॥ प्रात :— काळीं देव गेले ते उठोनी । न कळे करणी कैसी ॥१८॥ बापा मी सांगतें हेंचि हो प्रमाण । पुसावें जाऊन पांडुरंगा ॥१९॥ नामा म्हणे तुम्हां कळेल तैसें करा । नका या विचारा पुसों मज ॥२०॥ नामा म्हणे जने केलें असें कर्म । जाणे एक वर्म पांडुरंग ॥२१॥ धमकावुनी नेली त्यांणीं दासी जनी । सकळ ब्राम्हाणीं मिळोनियां ॥२२॥ श्रुत केली वार्ता गांर्वांच्या राजाला । ते म्हणे जनीला शूळीं द्यावें ॥२३॥ शूळ तो रोंविला चंद्रभागेतीरीं । पहती नरनारी द्दष्टी तेव्हां ॥२४॥ जनी आठवीत तेव्हां पांडुरंगा । कां गा तूं श्रीरंगा मोकलिसी ॥२५॥ घडी घडी येत होतासी तूं देवा । आज कां केशवा निद्रा आली ॥२६॥ कोठें गुंतलासी भक्तीचिया काजा । धांवें महाराजा येईं आतां ॥२७॥ प्रल्हादाकारणें नृसिंह झालासी । स्तंभीं प्रकटसी क्षणमात्रें ॥२८॥ दीनांचा दयाळू तुझें नांव बापा । कां हो अवकृपा केली मज ॥२९॥ द्रौपदीनें केला जेव्हां तुझा धांवा । आलासी केशवा क्षणामाजी ॥३०॥ माझा तुज देवा आला हो कंटाळा । आळ हा घातला मजवरी ॥३१॥ समजलें मज होतें तुझे मनीं । नसावी हे जनी पांडुरंगा ॥३२॥ करितां कामधंदा तुज आला शीण । कंटाळलें मन देवा तुझें ॥३३॥ कासयासी बोल ठेवूं तुज देवा । प्रारब्धाचा ठेवा फळा आला ॥३४॥ आतां ऐक माझी हेचि विनवणी । भेट चक्रपाणी एक वेळां ॥३५॥ न मागें मी कांहीं देवा तुज आतां । पायां पै अनंता ठाव देईं ॥३६॥ ऐकूनियां ऐसी जनीची विनवणी । आले चक्रपाणी धांवोनियां ॥३७॥ जनीच्या सांगातें होते राजदूत । नेलीगे त्वरित शूळापाशीं ॥३८॥ जनीनें तो शूळ पाहातां नयनीं । अकस्मात्‌ पाणी झालें त्याचें ॥३९॥ शस्त्रें जीं कां होतीं राजदूतां करीं । विरालीं तीं सारीं पाणी झालें ॥४०॥ विठोबानें तेव्हां आलिंगिली जनी । म्हणे माय बहिणी श्रमलीसी ॥४१॥ जनी म्हणे देवा तूं पाठीसी असतां । नाहीं भय चिंता आम्हालागीं ॥४२॥ श्रुत झाली वार्ता राजया लागोनी । शूळासूद्धां पाणी शस्त्रें झालीं ॥४३॥ समजलें तेव्हां तयाचे अंतरीं । जनीला श्रीहरी सांभाळितो ॥४४॥ चला जाऊं आतां जनीच्या दर्शना । सिद्ध झाली सेना पाय चाली ॥४५॥ क्षमा करीं माते आमुचे अन्याय । कृपा द्दष्टी पाहें आम्हांकडे ॥४६॥ देऊनियां वस्त्रें भूषणें जनीसी । गेला आश्रमासी राजा तेव्हां ॥४७॥ समजलें तेव्हां पंढरीच्या लोकां । जनीचा हा सखा पांडुरंग ॥४८॥ जनीचे अभंग लिहीत नारायण । करिती श्रवण साधुसंत ॥४९॥ धन्य तेचि जन धन्य तिची भक्ति । नामदेव स्तुति करीतसें ॥५०॥