भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाचा धरुनि हात । क्षणक्षणा पंढरिनाथ

namayacha dharuni hat | kshanakshana pandharinath

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामयाचा धरुनि हात । क्षणक्षणा पंढरिनाथ । ज्ञानदेवातें आठवित । कंठ सद्‌गदित करुनियां ॥१॥ उद्धवासी म्हणे पांडुरंग । या सज्जनाचा न व्हावा वियोग । हें ह्रदय होतसे दोन भाग । जाणा अंतरंग तुम्ही माझें ॥२॥ त्याविण गोड मज न वाटे । ऐसे जिवलग कैचे भेटे । जे मनींचा वियोग दुःख तुटे । समाधान वाटे ह्रदयामाजीं ॥३॥ ज्ञानदेवा ऐसो निधान । नाहीं धुंडितां त्रिभुवन । न संपडे न देखो जाण । तुझी आणि उद्धवा ॥४॥ धन्य धन्य हे तिघेजण । मुक्ताताई मुक्तरुपें पूर्ण । हीं उद्धरिलें त्रिभुवन । भवदुःख दारुण नासीलें ॥५॥ याचे निपडी पाडे । उपमेसी दीसे थोडे । परी ज्ञानदेवा ऐसें रत्न जोडे । हें न घडे कल्पांतीं ॥६॥ माझे जिवीचें गुह्यगुज । हें उद्धवा सांगितलें तुज । कां नामदेव जाणे सहज । आणि सकळ संत सज्जन ॥७॥ गुज सांगे रुक्मिणीसी । घडी घडी ह्रषिकेशी । तंव रुक्मिणीसी । मानसीं । या जीवलागासी आठवि ॥८॥ ज्ञानदेव तरी तुमचा अंश । केवळ स्वयंप्रकाश । स्वात्मसुख निजरहिवास । स्वानंद असे उद्‌बोध ॥९॥ निवृत्ति तुम्हां नाहीं भिन्नता । त्याचा आत्मा तुम्ही हो आनेला । शिव विष्णु आईक्यता । असे स्वभावता मुळींच ॥१०॥ सोपान तरि पोटींचा । तो प्रान असे तुमचा । तेथें शब्द भिन्नपणाचा । कोठें मिरवेल ॥११॥। संतभक्त सकळ मिळोनि । मस्तक ठेवला श्रीचरणीं । तंव बोले रुक्मिणी । तुम्हापासुनि दुरी नाहींत ॥१२॥ नामयाचें धरुनि चरण । साष्टांगीं करुनि नमन । म्हणे तूं सर्वांचे स्वानंद जीवन । मी दीन काय बोलों ॥१३॥