भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा न राहे खेद करुं । केशव ठेवी अभय करु

nama na rahe khed karun | keshav thevi abhay karu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामा न राहे खेद करुं । केशव ठेवी अभय करु । म्हणे तूं दुःखिया होसी थोरु । ज्ञानदेवाकारणें ॥१॥ धन्य धन्य तुम्ही भक्त । नित्य विष्णुचरणीं रत । पुण्यशील भागवत । ज्ञानदेव नामया ॥२॥ तुमचेनि जग हें कृतार्थ । कवित्वें तरेल हें सत्य । मायामोहो निरसे समस्त । नामस्मरणें तुमचेनी ॥३॥ धन्य ज्ञानादेव ज्ञानशीळ । ज्ञानदेवा ऐसा सुढाळ । मी न देखें भूमंडळ । सकळही पाहतां ॥४॥ तूं करिसी खेद त्याचा । तरी तो आत्मा माझा साचा । भाव सांडी सांडी द्वैताचा । निखळ स्वरुप पाहे पां ॥५॥ तुम्ही भक्त अवघे आवडते । तुमचेनि साजिरे पूर्णचित्तें । मज पंढरिये येणें आवडतें । नाम गाताती ये प्रीतीं ॥६॥ पुंडलिक माझा भक्त सखा । परी प्रेमळ तुम्ही विशेषा । तुमचेनि सर्व दुःखा । हरणें मी हें जाणावें ॥७॥ नामा म्हणे ज्ञानदेवाचें । मज दरुषण होईल साचें । तरीच रंगणी मी नाचें । हरिकीर्तनीं पंढरीये ॥८॥