भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा म्हणे स्त्रिये अनुचित केलें । कां माझ्या शिणविलें विठोबाशी

nama mhane striye anuchit kelen | kan majhya shinavilen vithobashi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामा म्हणे स्त्रिये अनुचित केलें । कां माझ्या शिणविलें विठोबाशी ॥१॥ निंदेच्याअ उत्तरीं निषेधिलें मज । वाटली त्या लाज मायबापा ॥२॥ मग तो माझा स्वामी जाला वेषधारी । तुजलागीं सुंदरी पुढारला ॥३॥ रत्नजडित मुगुट सत्वर फेडोनि । आलासे वेढोनी शुभ्र शेला ॥४॥ तेणें भारें त्याचा धवधगिला मस्तक । म्हणोनि मज शोक वाटतसे ॥५॥ कस्तुरी मळवट सुरेख पुसोनि । आलासे लावूनि विभुति भाळीं ॥६॥ रूद्राक्षाचे मणि लेऊनि कर्णपुटीं । कुंडलें गोमटीं लपविलीं ॥७॥ कौस्तुभ वैजयंति काढिली परती । बांधलेंसे प्रीतिं शिवलिंग ॥८॥ देखूनि रखुमाईस वाटलें उदास । हंसती उपहास केले त्याचे ॥९॥ रमा शरणागतें आलिंगिलीं बाहीं । कैसी गोणी तिहीं कवळिली ॥१०॥ सर्वांगीं साजिरी चंदनाची उटी । भ्रंशली गोमटी श्रमु जाला ॥११॥ सोनसळापटा फेडोनि गोमटा । नेसला धुवटा वोटधारी ॥१२॥ इंद्रनीळ तनु रूळली असेल रजें । श्रीमुख रवितेजें कोमाइलें ॥१३॥ धन्य तुझे नयन देखिले श्रीचरण । परी जीवें निंबलोण नाहीं केलें ॥१४॥ द्रव्याचेनि लोभें भ्रांत जालें मन । हातींचें निधान हारपलें ॥१५॥ आतां आदिअंतीं पाहतां केवळ । मूळा आणि फळ दुःखरूप ॥१६॥ जाणोनि निवृत्ति धरिली सज्जनीं । सांडिलें निर्वाणीं वमन जैसें ॥१७॥ जाणसी तें करीं आपुलें तूं हित । म्यां ठेविलें चित्त त्याचे पायीं ॥१८॥ नामा म्हणे केशव न पाहे निर्वाण । माझा अभिमान आहे त्यासी ॥१९॥