भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा म्हणे माते परियेसी वचन । गुज मी सांगेन अंतरीचें

nama mhane mate pariyesi vachan | guj mi sangen antarichen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामा म्हणे माते परियेसी वचन । गुज मी सांगेन अंतरीचें ॥१॥ धरोनि माझी वृत्ति पाहें माझें सुख । मी सांगतों तें ऐक जननिये ॥२॥ कायावाचामनें ममत्व माझ्या ठायीं । तें तूं ठेवीं पाई विठोबाचे ॥३॥ मग हा कृपासिंधु न विसंबेल तुज । अनाथाची लाज हाचि राखे ॥४॥ पाहे पां पशु जळचरें गांजिले । सकळीं सांडिले जिवलगीं ॥५॥ पितांबरासहित घालोनियां उडी । सोडविला पानेडी अनाथ म्हणोनी ॥६॥ प्रल्हादाकारणें जाला पैं पिसाट । धरिले विकट रूप देवें ॥७॥ विदारुनी दैत्य आवेशें बहुत । यानें माझा भक्त गांजियेला ॥८॥ पांडवांचें काज करितां नाहीं लाज । म्हणे शरण मज अनन्य भावें ॥९॥ पाडसाकारणें जैसी कुरंगिणी । तैसा रानींवनीं सांभाळित ॥१०॥ जन्मोनियां माझे बहु लळे केले । अडचणी सांभाळिलें अनाथनाथें ॥११॥ नामा म्हणे याचे दृढ धरिले चरण । कळिकाळापासोन सोडविलें ॥१२॥