भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोर पिसा कुंचे ढळताती अपार । येताती कुमर यशो-देचे

mor pisa kunche dhalatati apar | yetati kumar yasho-deche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मोर पिसा कुंचे ढळताती अपार । येताती कुमर यशो-देचे ॥१॥ शिंगें पावे मोहर्‍या वाजती कुसरी । हुंबर आखरी गगन गर्जे ॥२॥ मोतियांचे घोंस चांदवे झळकती । कनक दंड ढाळिती रामकृष्ण ॥३॥ गौरज डौरळा पीतांबार भिनला । स्वेद जो दाटला मुख कमळीं ॥४॥ रुळती वनमाळा कंठीं गुंजाहार । तरू घोंस अपार खोविलें शिरीं ॥५॥ गजगती पाउलें ठेविती भूमीवरी । धन्य ते संसारी डोळे देती ॥६॥ कुंकुम केशर रंगलें रातोत्पळ । ध्वज वज्रां-कुश कमळ उर्ध्व रेखा ॥७॥ विमानें आकाशीं झालीं पै सकळ । धन्य तें गोकुळ म्हणती देवा ॥८॥ देव पुष्पवृष्टी करिती कृष्णावरी । अंबर जयजयकारी गर्जतसे ॥९॥ माडिया गोपुरीं पाहती सुंदरी । यशोदेच्या करीं लिंबलोण ॥१०॥ ओंवाळिला नाम्या शिंप्याचा दातार । रखुमादेवीवर श्रीविठ्ठला ॥११॥