भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोडियेला धनुर्याग । हाहाकार झाला मग । आला आला रे श्रीरंग । बंधू बिळिरामा समवेत

modiyela dhanuryag | hahakar jhala mag | ala ala re shrirang | bandhu bilirama samavet

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मोडियेला धनुर्याग । हाहाकार झाला मग । आला आला रे श्रीरंग । बंधू बिळिरामा समवेत ॥१॥ आले ग्रामव्दारापाशीं । धांविले सकळहि नगरवासी । कृष्णरामाच्या सौंदर्यासी । पहावया उतावेळ ॥२॥ उभयतांचेहि स्वरुप अति नागर । ऐकिलें होतें वारंवार । आणि बळियेहि महावीर । तेज प्रतापी आगळे ॥३॥ सदा निर्भय मानसीं । आले चौबारा हाटवटिसी । जेवीं कां सिंह गजशाळेसी । शिरतां शंका न धरिती ॥४॥ उभे रंगशिळेवरी । अवलोकिता नरनारी । चढोनी माडिया गोपुरीं । गवाक्षव्दारीं पैं एकी ॥५॥ एके चढली भिंतीवरी । एक सन्मुखची शेजारीं । कृष्णदर्शनी आवडी भारी । नर बाळा नारी सारिखीचि ॥६॥ निळा म्हणे हत्कमळवासी । पूर्णब्रम्ह तेजोराशी । सगुणरुपिया हशिकेषी । कोण मा तयासी नावलोकीं ॥७॥