भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणे विठोजी शंकराचा । प्रत्यक्ष अवतार तुझा साचा

mhane vithoji shankaracha | pratyaksha avatar tujha sacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
म्हणे विठोजी शंकराचा । प्रत्यक्ष अवतार तुझा साचा । स्तुति केली असे वाचा । विस्मयाचा पूर मज ॥१॥ वसति सप्तद्वीप नवखंड । त्यामाजीं अनंत ब्रह्मांड । रोमरंध्रीं ज्या अखंड । तो मनुष्यरुपें मेदिनी ॥२॥ निवृत्तिनाथ नाना अवतारीं । तुमच्या सेवेसीं श्रीहरी । जें जें प्रेरसी कामारी । सांगितलें करी उगाचि ॥३॥ म्हणे देवाधिदेवा आतां । सांगाल तें करुं तत्वतां । हरुं भवार्णवाची चिंता । या त्रैलोक्याची ॥४॥ तंव निवृत्तीनें लोटांगन । म्हणे नाहीं तुज समान । आम्हांकारणें नारायण । साहाकारी होसी ॥५॥ आमुचा तपें समर्थें । तुवां सिद्धी पावविली जगन्नाथें । सरते करुनियां आम्हांते । विष्णुमार्गें लाविलें ॥६॥ देव म्हणे तूं आधीं । विष्णुमार्गींची सकळ सिद्धी । जाणतां तूं एकत्र शुद्धी । निवृत्ती होसी ॥७॥ नामा म्हणे ऐसे लळे । पाळिले तयाचे गोपाळें । देऊनियां समाधिसोहळे । विष्णुधर्म प्रतिष्ठिला ॥८॥