भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणे बा गौळणीचिया रागें । तुज म्यां बांधलें रे प्रसंगें । तंव त्वां उपटूनियां श्रीरंगें । उखळ येथें अडकविलें

mhane ba gaulanichiya ragen | tuj myan bandhalen re prasangen | tanv tvan upatuniyan shrirangen | ukhal yethen adakavilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणे बा गौळणीचिया रागें । तुज म्यां बांधलें रे प्रसंगें । तंव त्वां उपटूनियां श्रीरंगें । उखळ येथें अडकविलें ॥१॥ परी तें नयेचि तुज उगवितां । म्हणोनियां बळें ओढिलें ताता । तंव हे वृक्ष पडिले रे भाग्यवंता । अदृष्टें आमुच्या वांचलासी ॥२॥ मग त्या म्हणती गौळणी नारी । खेद न करीं वों सुंदरी । त्वांचि हा परमात्मा श्रीहरि । मारिला होता निज हस्तें ॥३॥ गत गोष्टी काय ते आतां । न करीं यावरी जिवा परता । उदंड गाहाणींही सांगतां । तूं तें तत्वतां मानू नको ॥४॥ आजींचाचि पाहें पां अनर्थ । केवढा चुकला अवचिता घात । अदृष्टाचा हा कृष्णनाथ । म्हणोनियां वांचला निज भाग्यें ॥५॥ आतां तरी सांभाळुनी । पहा हा भ्याला असेल मनीं । हे केवढे वृक्ष पडिले अवनीं । घोर घोषें दणाणिले ॥६॥ निळा म्हणे यावरी यशोदा ॥ पुसे भ्यालासि बारे गोविंदा । तव तो हांसोनियां गदगदा । म्हणे मज भ्य कोणाचें ॥७॥