भजनी मालिका
← भजनांकडे परत

मतमांतांतरें रचूनियां ग्रंथु ज्ञानव्युत्पत्ति

matamantantaren rachuniyan granthu dnyanavyutpatti

मतमांतांतरें रचूनियां ग्रंथु ज्ञानव्युत्पत्ति जंव जाली नाहीं आत्मप्रतिती । ये सकळ विज्ञानें विषयासक्तीचेनि अनुमानें तेणें केंवि तुटे संसृती । अंतरींचा स्फुलिंग जाज्वल्य जाणतां कामक्रोधाचिया उपपत्ती । बाह्य दीक्षा उदंडी आणुनिया तेणें केविं होय ब्रह्मप्राप्ती रया ॥१॥ सुटलेपणें करिसी विषय त्याग तेणें अंतरीं होय अनुराग । परतोनि तरीच पावशी ब्रह्म भाग रया ॥२॥ आपुलेनि रुढपणें ग्रंथाचे विज्ञानें संपदा मिरविती ज्ञातेपणें । अंतरी आशापाश विखार भरणें जगीं संतता मिरवणें । येणें द्वारें म्हणसी मी वंद्य जगीं कीं उपासनाद्वारें मुक्त होणें । पालट केलिया साठीं सिणो नको बापा जेविं गधर्व नगरीं वस्ती करणें रया ॥३॥ यालागी दंभ दर्प सकळ प्रतिष्ठादि भ्रांति धनदाराविषयासक्ती । ऐसा अहंममते ज्ञातेपणाचेनि अहंकारें तेणें केविं होय आत्मप्राप्ती । जंव येणें देहें विनीतता शरण गेला नाहीं संताप्रती । बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतितां । सर्व सुखाची होय निजप्राप्ती रया ॥४॥