भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता वाट पाहे नामा अजुनी कां नये । देखोन विठ्ठल काय भुलला तेथें

mata vat pahe nama ajuni kan naye | dekhon viththal kay bhulala tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माता वाट पाहे नामा अजुनी कां नये । देखोन विठ्ठल काय भुलला तेथें ॥१॥ ऐसें मज पाहतां हेंचि घडे साचें । विठ्ठलीं मन त्याचें गुंतलें असे ॥२॥ काय सांगों माय जाल देवळासी । जपतो अहर्निशीं विठ्ठ्ल नामाअ ॥३॥ तहान भूक कांहीं आथीचना मनीं । विठ्ठल विठ्ठल म्हणोनि हाचि छंद ॥४॥ नेणो कवण्या गुणें भुलविलें यातें । विंदान आमुतें न कळे कांहीं ॥५॥ दिशा अवलोकितां प्राण नव्हे निश्चित । बहुत क्षुधाक्रांत जाली असे ॥६॥ तेथून लवलाहे धांवत निघाली । महाद्वारा आली पहावया ॥७॥ तो तंव पांडुरंगा सन्मुख देखिला । चित्रींचा लिहिला पुतळा जैसा ॥८॥ नाहीं चळणवळण तटस्थ नयन । केलें निंबलोण योगिजनीं ॥९॥ ते देखोनि मातेसी थोर द्वेष आला । क्रोधें आसुंडिला करीं धरुनि ॥१०॥ तंव प्रेताचियेपरी पडिला भूमीवरी । देखोनि सुंदरी रुदना करी ॥११॥ मग उचलोनि ओसंगा धरिला पोटासी । म्हणे कांरे रुसलासि सांग नाम्या ॥१२॥ निढळासी निढळ निळवुनि ते रडे । माझिया कानाडे काय जालें ॥१३॥ दृष्टि उघडुनी नामा भोंवतें जंव पाहे । तंअव सन्मुख माय देखियेली ॥१४॥ येरी उचलोनि दिधलें आलिंगन । जालें समाधान तयेवेळीं ॥१५॥ सुह्रदें सोयरीं सकळिकें मिळोनि । करिती झाडणी नानारपरी ॥१६॥ माउली नव्हेसि तूं वैरिणी जाण । माझ्या केशवाची खूण अंतरली ॥१७॥ शस्त्रेंविण वध केला अवचिता । जीव तळमळतां जाऊं पाहे ॥१८॥ आतांअ परतोनी माझी वाट पाह्सी । साच रिपु होसी तरी जाणा ॥१९॥ नामा म्हणे माते जाई हो येथुनी । मज जाई निरवूनि विठोबासी ॥२०॥