भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग उड्डाण केलें गरुडें । गगन आक्रमिलें चंडें

mag uddan kelen garuden | gagan akramilen chanden

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग उड्डाण केलें गरुडें । गगन आक्रमिलें चंडें । वरी आरुढले प्रचंडें । भक्त देव सकळिक ॥१॥ पक्षाचेनि फडत्कार । ग्राम ठाकिला संवत्सर । गिरीकडे पठार । शिखरीं गरुड उतरला ॥२॥ ते दिनीं समारंभ केला । महा उत्सव तरिसी जाला । जयजयकार प्रवर्तला । विमानें दाटलीं आकाशीं ॥३॥ दृष्टी देखावया कौतुक । शिवगण आले सकळिक । कर्ता ब्रह्मांडनायक ते कौतुक अवलोकिती ॥४॥ मुनि पुंडलिक उतरला । संगतीं वैष्णवांचा मेळा । समाधि लक्षण डोळां । पाहती देव सकळिक ॥५॥ हातें खाणोनि भूमिका । अमृत शिंपुनी सुगंधिका । महामंगळिक सुखा । वेदघोष आरंभिले ॥६॥ नामा म्हणे सुखसंगतीं । वैष्णव हरिनाम जर्जती । लक्ष्मी नारायेण क्षितीं । उतरोनि समाधि देताती ॥७॥