भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग त्या मिळोनियां सकळ जनीं । मध्यें बैसवूनियां शारंगपाणी । भोंवत्या खेळविती खेळणीं । नाचती नाचणीं गीतस्वरें

mag tya miloniyan sakal janin | madhyen baisavuniyan sharangapani | bhonvatya khelaviti khelanin | nachati nachanin gitasvaren

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग त्या मिळोनियां सकळ जनीं । मध्यें बैसवूनियां शारंगपाणी । भोंवत्या खेळविती खेळणीं । नाचती नाचणीं गीतस्वरें ॥१॥ कृष्णा म्हणोनियां आळविती । मधुर स्वरें गायनें गाती । तेणेंचि मिसें त्या कृष्णासि स्तविती । आणि रंजविती परमात्मया ॥२॥ म्हणती गे नंदयशोदेचें पुण्य । उरलें त्रैलोक्या पुरोन । आम्हां झालें तें सुप्रसन्न । कृष्णाकृती या काळें ॥३॥ म्हणोनियां जिवेंप्राणें । ओवाळिती तनुमनें । घालूनियां दिव्यासनें । वरी कृष्णातें बैसविती ॥ ४॥ करुनियां आनंद सोहळा । खेळती नानापरीच्या खेळा । लई लई लखोटें पिंगे सकळा । फुगडया घलिती निज वारें ॥५॥ हेटी मेटी । कपाळ झेटी । पक्कें घालिती नमन लल्लाटीं । टोकर खडेही झेलिती बेटी । नाचती टिपरी घेऊनियां ॥६॥ निळा म्हणे ऐशियापरी । रंजविती जगदात्मयाहरी । आणि घेऊनियां अंकावरी । क्रीडा विनोदें खेळविती ॥७॥