भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग सारोनी संध्यास्नान । देवभीक्त विष्णुपूजन

mag saroni sandhyasnan | devabhikta vishnupujan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग सारोनी संध्यास्नान । देवभीक्त विष्णुपूजन । पंक्ति आदरिलें आपोशन । मागुती भोजन करिताती ॥१॥ धन्य धन्य तूं ज्ञानराजा । तूं आवडलासि केशिराजा । पंक्ति करोनि द्विजा । वाढितसे रुक्मिणी ॥२॥ राही रुक्मिणी सत्यभामा । वाढिती पंचामृत उत्तमा । पुंडलिक बोलावुनि साउमा । ज्ञानदेवा पंक्ति बैसविलें ॥३॥ निवृत्ती सोपान मुक्ताबाई । गोपाळ देव्हढे दोन्ही बाहीं । रुक्मिणी सत्यभामा राही । वाढिती अन्नें नानाविधें ॥४॥ वैष्णव प्रेमळाचे पंक्तीं । प्रार्थना करितसे श्रीपति । सोपान ज्ञानदेव निवृत्ती । एकवट बैसविले ॥५॥ गरुड तिष्ठत होता द्वारीं । त्यासी रुक्मिणी ताट करी । मग गर्जिन्नले जैजैकारीं । गोविंद श्रीराम उच्चारें ॥६॥ देव आकाशीं पाहाती । ब्रह्मादिक वंचलों म्हणती । भाग्य केवढें यांचें क्षितीं । या भक्तजनांचें ॥७॥ नामा म्हणे आळंकापुर । धन्य धन्य मनोहर । आपण येउनि सारंगधर । समाधि देती ज्ञानदेवा ॥८॥