भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग म्हणे सर्वज्ञ विठठल । न लावावा वाढवेळ

mag mhane sarvadnya vithathal | na lavava vadhavel

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग म्हणे सर्वज्ञ विठठल । न लावावा वाढवेळ । मग पातले निर्मळ । सिद्धेश्वरलिंगी ॥१॥ धन्य धन्य हरिदिवस । धन्य धन्य हा निवास । आपण ह्रषिकेश । भक्ता साह्य ॥२॥ वैष्णव मिळाले संपन्न । गाती हरिनाम कीर्तन । तंव पातले सोपान । प्रेमें वोसंडत ॥३॥ चरणीं घातली मिठी । विठोजी म्हणे उठी उठी । लवलाहें उघडी दृष्टी । भेटे ज्ञानदेवा ॥४॥ येरु म्हणे मी कृतकृत्य । नामस्मरण तुझें नित्य । तेणें सकळ हित । आमुचें जालें ॥५॥ तूंचि गा जनकजननी । तूंचि एक त्रिभुवनीं । पाहतां नित्य उन्मनीं । लागे आम्हां ॥६॥ समाधि शेज ज्ञानेंसी । घातली अहर्निशीं । ते कर्णीं परिसत जिवेंसी । तुवां चरण धरित आलों ॥७॥ नामा म्हणे ज्ञान सोपान । एक जाले जनीं जनार्दन । समाधिसंगें संजीवन । आळंकापुरी आले ॥८॥