भजनी मालिका
← भजनांकडे परत

मदलसा म्हणे पुत्रा तूं मुक्त होतासी

madalasa mhane putra tun mukta hotasi

मदलसा म्हणे पुत्रा तूं मुक्त होतासी । संसारमायामोहें कारे बध्द जालासी । सिध्द तें विचारी पां जेणें सुखिया होसी ॥१॥ चेईतूरे तानुलिया जाई श्रीगुरु शरण । देहभावीं व्यापिलासी मग तुज शिकविल कवण । अज्ञानपण सांडूनियां तूं चुकवी जन्ममरण । गर्भवास वोखटारे गर्भी दु:ख दारुण ॥२॥ जागृति आणि निद्रा तुज स्वप्नीं भरु । सुषुप्ति वेळोवेळां तुज पडिला विसरु । तें जव नेणसिरे तव तुज नाहीं निर्धारु ॥३॥ देह तव नाशिवंत तूं कारे भुललासी । अखंड तें विचारी पां जेणें सुखिया होसी । दु:ख तें आठवीरे गर्भी काय भोगिसी । कोसलियानें घररे सदृढ पैं केलें । रिगुनिगु न विचारीतां तेणें सुख मानिलें । जाहालें बाळा तुज तैसें यातायाति भोगविलें । मोक्षद्वार चुकलासी सकळही कर्मे संचिलें ॥५॥ सर्पे दुर्दर धरियेलारे मुखीं तंव तेणें माशी तोंडीं धरियेली शेखीं । तैसा हा मायामोहो तुज कारे नुपेक्षी । इंद्रियें व्यापुनियां संसारी सुखि दु:खी ॥६॥ मृगरे जळ जैसें हेलावत पैं दिसे । तैसें हे भ्रांति माया । तुज नाथिली आभासें । उत्पत्ति प्रळय दोन्ही ये तरी तुज सरिसे । स्थिर होऊनि विचारी पां आणिक नाहीं बा तैसें ॥७॥ मृग पक्षी कीटकु पतंग होसी । आक्षेपी संचरेरे नाना योनी पावसी । पूर्ण ज्ञानसुख जेणें तें तूं कारे नेणसी । अविनाश तेंचि तूरें वायां सबळ कां करिसी ॥८॥ परब्रह्म बाप तुझा इच्छा माया हे तुझी । अंशरे तूं तयाचा सबळ कारे बुध्दि तुझी । अज्ञान तुज व्याली ते नव्हे कारे वांझी बा नव्हेचि कां वांझी । तेणें तूं भुललासी ऐक शिकवण माझीं ॥९॥ परतत्त्वा आणि तुज बाळा नाहीरे भिन्न । अनादि तूं आहेसिरे परि हें न देखें मन । अकर्म कर्म केलें तेणें जालें अज्ञान । निष्कर्म होय जेणे तें तूं करी कांरे ज्ञान ॥१०॥ पुत्र म्हणे वो माते मी अनादि कैसा । मी माझें जाणता वो मी अज्ञान कैसा । उकलु केवि होय तुज कैसा भरंवसा । जीवनन्मुक्त होय दृष्टि दाखवी तैसा ॥११॥ पापपुण्य दोन्ही मजसवेंचि असती । करणी माते थोर त्याची ते आहे चालती । उकलु केंवि होये होय तें सांग मजप्रती । बुझावि वो माझे माते ऐसी करी विनंती ॥१२॥ केली कर्मे जरि तुवां न संडिवो पाठी । कवणतें प्रकासील हे विपरीत गोष्टी । उकलु केवि होय ते सांग मजप्रती । जेणें मी दृढ होय ते बुध्दि देई वो लाठी ॥१३॥ अनंत कर्मे मातें घडलीं वो मज । तीं तंव न संडिती ऐसें ज्ञान पैं तुज । तरी म्या काय कीजे केविं पावणें सहज । दुर्घट वाट आहे कैशानि निफजेल काज ॥१४॥ उठी पुत्रा जाई बाळा तीर्थरे हिंड । साधु आणि संत जेथें असती बा उदंड । तयामाजी आत्मज्ञानी जो कां न बोले वितंड । तो तूं गुरु करि तो तुज बुझवील प्रंचड ॥१५॥ ज्ञानविज्ञानरे गुरु मुखे बुझसी । विचारुनि अनुभउ आपेंआप जाणसी । जेणें जालें अनंत सिध्द तें तूं कारे नेणसी । हरिहर ब्रह्मादिक तेहि ध्याती तयासी ॥१६॥ नव्हतां बाळा नादबिंद तैं तूंरे सहज । तेंथेचि तूं होतासि ऐसें ज्ञान पैं तुज । तेथे तूं लीन होई करी आपुलें काज । संसार साभिमानें घेई तेथीचें व्याज ॥१७॥ उपजतां गर्भ अंधु जया नाहीं प्रकाशु । पूर्वी तो योगभ्रष्ट चुकवि गर्भवासु । गुरुवचनी भजे पुत्रा परब्रह्मी करि वासु । अमृत सेवि पारे झणी होसी उदासु ॥१८॥ तुज ऐसें रत्नबाळा कवणेरे केलें । आणिक अनंत जीव चराचर भुतले । तेणेरे इच्छामात्रें क्षणामाजी रचीलें । तें तूंरे नेणसीच येवढें कैसे चुकविलें ॥१९॥ सांडि बाळा काम क्रोधु हा दुजेन विचारु । जिहीं तुज अंतरविलें त्याचा करि हा संहारु । गुरुचरणीं भजे पुत्रा तो तुज देईल विचारु । अविनाशपद पावशी मग तुज होईल निर्धारु ॥२०॥ सहज यम नेम गुरुकृपारे करी । आसनें प्राणायाम प्रत्यहार उदरी । धारणा होईल तुज मग ध्यान विचारीं । समाधी होई पुत्रा तूं जाण निरंतरी ॥२१॥ षडचक्रा वेगळेरे तें जाणिजे कैसे । अनुभवें जाणसीरे तुज सहजे प्रकाशें । तैसा हा ज्ञानयोगु गुरुकृपारे दिसे । अज्ञान निरसूनियां ज्ञान पैं समरसें ॥२२॥ अव्यक्त तिहीं लोकीचें तुजमाजिरे असे । त्रैलोक्य जयामाजि तैं तुज पैं दिसे । अविनाशपद होंसी मग अज्ञान नासे । तुजमाजि अमूर्तरे आपेंआप प्रकाशे ॥२३॥ अव्यक्त अगोचर मज होईल निरंतर । इंद्रियें स्थिर होती हे तुझे अंकुर । अविनाशपद होसी मग नहीं येरझार । अष्टमहासिध्दि जया वोळगती तुझें द्वार ॥२४॥ ऋध्दिसिध्दि मायासिध्दि यासि दिधली । तुर्याचिया उपरिरे ज्ञान उन्मनी देखिली । आशापाश सबळ माया जीवबुध्दि निमाली । गर्भवास चुकलारे कैसी बुध्दि स्फुरली ॥२५॥ संतोषोनि कृपादृष्टी ज्ञान पैं लाधविला । आत्मतत्त्व बोधु तुज प्रकाशुरे जाला । समरसिं सोहंसिध्दि प्रबोधु निमाला । निवृत्ति प्रसारेरे ज्ञानदेवो बोलिला ॥२६॥