भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोक सकळहि बाहेरी येती । तंव निर्मळ गगन शुध्द गभस्ती । नवा चारा धेनुवा चरती । आणि दुभती यथेष्ट

lok sakalahi baheri yeti | tanv nirmal gagan shudhda gabhasti | nava chara dhenuva charati | ani dubhati yatheshta

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लोक सकळहि बाहेरी येती । तंव निर्मळ गगन शुध्द गभस्ती । नवा चारा धेनुवा चरती । आणि दुभती यथेष्ट ॥१॥ तंव गडी अवघे मस्तकावरी । धरुनियां होते गिरी । गर्वारुढ ते अंतरीं । आम्ही पर्वत उचलिला ॥२॥ कृष्ण येथें टाळाटाळी । करुनियां म्हणावी आपणा बळी । ओझीं आमुचिया निढळीं । आपण मोकळा फुल झळका ॥३॥ कृष्णें जाणोनी मनोगत । म्हणे रे गडीहो काढा हात । येरु म्हणती तूंचि त्वरित । जांई येथूनी वेगळा ॥४॥ ओझें आमुचीया निढळीं । उगीचि टेकिली तुवं आंगोळी । यश घेऊनियां वनमाळी । वाउगाचि मिरविसी आम्हांत ॥५॥ मग त्यातें म्हणे श्रीहरी । मस्तक तुम्हीं काढा तरी । सोडुनी पाहतां नखाचि वरी । धरिला देखती सकळही ॥६॥ मग म्हणती उतरां आतां । एकल्या नुरवेचि तत्त्वतां । चौफेरी मस्तकीं धरितां । कृष्णें काढली आंगोळी ॥७॥ तंव ते दडपिली त्यांच्या भारें । मेलों मेलों म्हणती पोरें । कृष्ण म्हणे तुम्ही बळिये कीं रे । धरा उचलुनि निज शक्ती ॥८॥ निळा म्हणे पुरुषोत्तमा नेणवे म्हणती तुझा महिमा । धांव धांव रे मेघ:श्यामा । आम्हां वांचवी खचता हा ॥९॥