भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुंभार तो राक कांता त्याची बंका । कन्या नाम रंका तिघे जण

kumbhar to rak kanta tyachi banka | kanya nam ranka tighe jan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुंभार तो राक कांता त्याची बंका । कन्या नाम रंका तिघे जण ॥१॥ पंढरीक्षेत्रांत राहतां आनंदें । वाचे गोविंद आळविती ॥२॥ करिती आपुला स्वकर्म व्यवहार । वाचे निरंतर रामनाम ॥३॥ घडोनि भाजणें ठेविली घरांत । व्याली डेरियांत मांजर ते ॥४॥ न देखितां त्यानें आवा तो रचिला । अग्नि तो लाविला तेचि वेळां ॥५॥ फिरूनि मांजर घरासि ते आली । नाहींत तीं पिल्लीं डेरा तोही ॥६॥ आव्यापाशीं तेव्हां आली ती धांवत । ओरडत फिरत भउताली ॥७॥ पाहूनि राका समजला मनीं । आहा चक्रपाणी काय केलें ॥८॥ जळो जळो माझा प्रपंच व्यवहार । नाहीं म्यां विचार केला देवा ॥९॥ करावया गेलों प्रपंचाचें हित । पापाचे पर्वत झाले माथां ॥१०॥ अज्ञान हीं बाळें जळतील आतां । धांव पंढरीनाथा येचि वेळां ॥११॥ पांडव ते रक्षिले लाक्षातें जोहरी । तैसी करी परि पिल्लियांसी ॥१२॥ आगीमाजी तुवां प्रल्हाद रक्षिला । अगाध हें तुला काय झालें ॥१३॥ रक्षीं यासी आतां येऊनियां अंगें । घेईन वैराग्य नवस हाचि ॥१४॥ तिघांजईं तेव्हां त्यजिलें अन्नपाणी । धांव चक्रपाणी लवलाहीं ॥१५॥ तीन रोज झाले शांत झाला अग्नि । पाहाती उकलूनि आवा तेव्हां ॥१६॥ सर्वस्व भाजणें भाभूनियां गेलीं । खेळताती पिल्लीं डेरियांत ॥१७॥ कच्च असे डेरा नसे आंच त्याला । माझें नवसास पावला पांडुरंग ॥१८॥ पाहती सकळ पंढरीचे लोक । अगाध कवतुक देवाजीचे ॥१९॥ आनंदोनी राका बोलवी ब्राम्हण । दिलें तें लुटून घर तेव्हां ॥२०॥ वेंचूनियां चिंध्या लाविती ढुंगासी । भावें ह्रषिकेशी आळविती ॥२१॥ जाऊनियां वनीं वेंचिताती काष्ठें । उदरापुरतें विकिताती ॥२२॥ अखंड करिती नामाचा गजर । ध्यानीं मनीं वर रखुबाईचा ॥२३॥ बंका गेली असे चंद्रभागे स्नाना । नामयाचि कन्या धुया आली ॥२४॥ बंका बोले बाई सिंतोडे येतील । ऐकूनियां बोले येरी तिसी ॥२५॥ जातीची कुंभार कामीक वैराग्य । घेतलेंसे सोंग कासीयासी ॥२६॥ ऐकूनियां बंका करीत उत्तर । बौद्ध अवतार पांडुरंग ॥२७॥ रडका हा नामा घॆतलीसे आळी । त्यानें वनमाळी बोलविला ॥२८॥ अबोल हा देव बोलविला यानें । काय थोरपण आलें यासी ॥२९॥ वाढविली कीर्ति जगांत डांगोरा । बोलविला खरा पांडुरंग ॥३०॥ चंद्रभागे तीरीं झाला वृत्तांत । श्रुत झाली मात नामयासी ॥३१॥ नामदेव तेव्हां आले राउळासी । विनंति देवासी करुनी बोले ॥३२॥ राकाकुंभारानें घेतलेंसे वैराग्य । कांहो केला त्याग संसारींचा ॥३३॥ बोले पांडुरंग निष्काम हे भक्ती । दावितों प्रचिती तुजलागी ॥३४॥ विठ्ठल रखुमाई नामा असे संगें । आलीं तेव्हां तिघें बनाप्राती ॥३५॥ रुक्मिणीनें तेव्हां काढुनी कंकण । ठेविलें झांकून काष्ठामाजी ॥३६॥ राका बंका वंका वेंचिताती काष्ठ । आली अव्चित तया ठायां ॥३७॥ उचलितां काष्ठ देखिलें कंकण । दिलें तें ढाकून तेचि वेळां ॥३८॥ म्हणती याजलागीं विटाळ जाहला । न घेती तयाला म्हणोनियां ॥३९॥ पाहुनी रुक्मिणी विस्मय करीत । निष्काम हे भक्त देखीयेले ॥४०॥ बोले रखुमबाई अहो पांडुरंगा । भेटावें श्रीरंगा याज लागीं ॥४१॥ नामा म्हणे देवा वंदितों मी चरण । धरा आलिंगून तिघांजणा ॥४२॥ होती हे आवडी देवाजीचे चित्तीं । आलिंगिलीं प्रीतीं तिघेजण ॥४३॥ राका बंका वंदिती चरण । कांहो येणें केलें देवराया ॥४४॥ उष्णकाळ दिन श्रमली माझी आई । बैसा रसुमाबाई छायेखालीं ॥४५॥ ऐसी असे ज्याची देवावरी माया । करी त्यासी दया पांडुरंग ॥४६॥ नामदेव बोले त्यचा मी हा दास । शरण तयास वारंवार ॥४७॥