भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळु भक्तांचा कैवारी । क्रोध दैत्यांदानवांवरी । एका तारी एका मारी । एका उध्दरी नाममात्रें

krupalu bhaktancha kaivari | krodh daityandanavanvari | eka tari eka mari | eka udhdari namamatren

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृपाळु भक्तांचा कैवारी । क्रोध दैत्यांदानवांवरी । एका तारी एका मारी । एका उध्दरी नाममात्रें ॥१॥ एका घरीं एका दारीं । एका ह्रदयीं एका परिवरी । एका धुंडितां अष्टही प्रहरीं । न सांपडे माझारी त्रैलोक्या ॥२॥ एकपत्नीव्रत दशरथा घरीं । रेणुकानंदन हा ब्रम्हचारी । मुंजिया बटु बळिच्या व्दारीं । महा व्यभिचारी नंदाचा ॥३॥ मोहनी रुपें सुंदोपसुंद । मोहुनी परस्परें करविला वध । वृंदेसी करुनियां शकट भेद । वधिला जालंदर रणरंगी ॥४॥ मत्स्यें केला शंखोव्दार । कुमें घेतला धराभार । वराहें हिराण्यक्ष असुर । मर्दुनी धरा धरिली निजदंती ॥५॥ नृसिंह हिरण्यकश्प विदारिला । वामनें बळी पाताळीं घातला । परशुरामानें सहस्त्रार्जुन वधिला । पृथ्वीचा केला दान धर्म ॥६॥ रामें रावणाचें मर्दन । केलें देवांचे बंदी मोचन । कृष्णें काळयवना जाळून । कंस चाणूर निवटिले ॥७॥ बौध्यें मोडविला दैत्ययज्ञ । वेदनिंदा निजमुखें करुन । कलंकिया म्लेंछचेनि निकंदन । पुढील कार्यार्थ हा असो ॥८॥ ऐसे अवतार घेउनी हरि । भूभार हरिले नानापरी । आपुलिया दासाचें रक्षण करी । संत चराचरीं गर्जती ॥९॥ चतुराननरुपें सृष्टीचें सृजन । विष्णुरुपें प्रतिपाळण । रुद्ररुपें परम क्षोभोन । करील संहार सकळांचा ॥१०॥ शंभु त्रिपुरातें संहारी । गजासुराचा मस्तक उतरी । गणेशरुपें नृत्यांच्या गजरीं । एका दैत्या चुरी पदघातें ॥११॥ ऐसीं हे चरित्रें श्रवण करितां । ठावो नुरेचि दोषा दुरिता । ब्रम्हानंदें श्रोता वक्ता । मुक्ति सायोज्यता पावती ॥१२॥ नानारुपें नाना नामें । नाना अवतार नाना कर्मे । धर्म रक्षिले ते सुखसंभ्रमें । निळा म्हणे सप्रेमें गर्जत ॥१३॥