भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोल्हापुरीं गाय होती जे सांगाते

kolhapurin gay hoti je sangate

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
कोल्हापुरीं गाय होती जे सांगाते । कांहीं तें दुग्धातें देत होती ॥ १ ॥ गाय ते बांधोनी घातकी घरांत । सोटेही मारीत तयेलागीं ॥ २ ॥ पाहों गाय तंव न दिसे पाहतां । तुकोबासी व्यथा तेचि झाली ॥ ३ ॥ पाहातोसी काय होत असे कष्टी । तीन रात्री खुंटी बांधलीसे ॥ ४ ॥ नाहीं तृण पाणी मारिलेंसें फार । धांवण्यासी थोर नाहीं दिसे ॥ ५ ॥ तुकोबा जागृत झाले तंव पाठ । सुजेली ती नीट होयेची ना ॥ ६ ॥ सोटे अंगावरी दिसती तुकोबा । आठवी विठोबा नानापरी ॥ ७ ॥ देखोनी तयासी कष्ट होती जनां । सांगितलें स्वप्नांतील सर्व ॥ ८ ॥ तुकोबा अंतरीं आठवुनी देवा । धांव रे माधवा सोड म्हणे ॥ ९ ॥ कोणें गाय कोठें बांधिली कळेना । धांव नारायणा गाय रक्षीं ॥ १० ॥ तंव अकस्मात तयाचिये गृहीं । अग्नि लागे तोही महाथोर ॥ ११ ॥ धांवोनिया लोक विझविती अग्नि । गाय ते निमग्नीं बैसलीसे ॥ १२ ॥ जे गाय पहाती आजी तीन दिवस । चांडाळें तियेस बांधिलेंसें ॥ १३ ॥ गाय सोडोनिया आणिली बाहेरी । तंव पाठिवरी मारिलेंसे ॥ १४ ॥ भ्रतार आपुला बोलावुनी पाहे । गाय सांभाळीं हें ब्राह्मणा तूं ॥ १५ ॥ तुकोबा धांवोनी करी प्रदक्षिणा । नमस्कारी गुणा धन्य तुझे ॥ १६ ॥ दाखविलें स्वप्न मज गाय तुवां । न कळेचि धांवा केला माझा ॥ १७ ॥ तुझा माझा एका आत्मा सर्वांगत । ते साक्ष निश्चित आली मज ॥ १८ ॥ ऐसा तुकोबानें केला फार धांवा । तंव माझ्या जीवा दुःख झालें ॥ १९ ॥ मजही तैसेची क्लेश झाले फार । साक्ष हें अंतर विठ्ठलाचें ॥ २० ॥ तुकोबाचे पाठी पाहाताती जन । गायही देखोन थोर कष्टी ॥ २१ ॥ बहिणी म्हणे ऐसें वर्तलें हें जाण । गायीचें निर्वाण हरी जाणे ॥ २२ ॥