भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशव नारायण हा जप आमुचा । सर्व हा मंत्राचा आत्माराम

keshav narayan ha jap amucha | sarva ha mantracha atmaram

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशव नारायण हा जप आमुचा । सर्व हा मंत्राचा आत्माराम ॥१॥ माधव गोविंद सर्वशास्त्रीम आहे । उभारुनियां बाहे वेदु सांगे ॥२॥ नामाचेनि पाठें तरुं हा भवसागरु । आणिक विचारु नेणों आम्ही ॥३॥ विष्णू मधुसूदन हें दैवत आमुचें । नित्य पैं नामाचें सार आम्हां ॥४॥ त्रिविक्रम वामन सर्व ब्रह्मांडनायकु । हाचि जप सम्युक आम्हां घटीं ॥५॥ श्रीधर ह्रषिकेष मंत्रराज जपा । पावाल स्वरुपा विष्णुचिया ॥६॥ पद्मनाभ दामोदर हा नामाचा विस्तार । करितां विचार तरले जीव ॥७॥ संकर्षण वासुदेव पंढरीचा राणा । सांगितल्या खुणा खेचररार्ये ॥८॥ प्रद्युम्न अनिरुद्ध दैवत कुळीचें । पुंडलिक तयाचें तपसार ॥९॥ पुरुषोत्तम अधोक्षज वैकुंठ निर्मळ । जपतां सकळ पापें जाती ॥१०॥ नरसिंह अच्युत नामाचें कवच । जपतां होय वेंच संसारासी ॥११॥ जनार्दन उपेंद्र नाम हें अमृत । शंकर निवांत जपे सदा ॥१२॥ हरी कृष्ण विष्णू सर्व घटी नांदें । तोचि पैं आल्हाद उच्चारजेसु ॥१३॥ ऐसा नाम महिमा उपदेश गोमटा । नामेंचि वैकुंठा भक्त गेले ॥१४॥ नामा म्हणे ते मूर्ति पंढरिये गोमटी । नामें उठाउठी भेटी देसी ॥१५॥