भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशव म्हणे नाम्या सुखाच्या निधाना । दे रे आलिंगना आवडत्या

keshav mhane namya sukhachya nidhana | de re alingana avadatya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशव म्हणे नाम्या सुखाच्या निधाना । दे रे आलिंगना आवडत्या ॥१॥ जिवलगा जवळोनि नवजे कोठें दुरी । वाटे तुज अंतरीं घालावासी ॥२॥ न पुरे माझें आर्त घेतां तुझें सुख । मज नित्य तृप्ति भूक वाटे थोरी ॥३॥ उत्कंठित चित्त अखंड तुजकारणें । तुज देखिल्या पारणें होय नयना ॥४॥ अनंत जन्माचा हा ऋणानुबंधू । तरीच प्रीतिवादु न तुटे तुझा ॥५॥ तुवां मजलागोनि देह कर्वतीं दिधले । उग्र तप साधिलें जन्मोजन्मीं ॥६॥ त्यजोनि सर्व माया चित्त निरोधिलें । ह्रदयीं मज बांधिलें वश्य करोनी ॥७॥ तुज काय देईजे उतराई होईजे । ऐसें न देखिजे त्रिभुवनीं ॥८॥ शरीर प्राणाचें त्वां देऊनि बळिदान । केलें पैं निवणि भक्तराया ॥९॥ करावें म्यां दास्यत्व आपुलेंनि अंगें । तुज तरी कांहीं नलगी देणें घेणें ॥१०॥ नामा म्हणे देवा तूं दीनाचा कैवारी । म्हणोनि मजवरी करिसी मोहो ॥११॥