भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोहार माय बाप जोहार

johar may bap johar

जोहार माय बाप जोहार । मी कृष्णाजी घरंचा पाडेवार । त्याचे घरांतला सर्व कारभार । माझे शिरावर की जी माय बाप ॥१॥ कामाजी बाजी हुद्देदार । तेणें रयतेचा केला मार । रयत फार नागविली की जी माय बाप ॥२॥ क्रोधाजी बाबा शेखदार झाले । त्याजकडे हुजूरचें काम आलें । तेणें कामाजीचें छळण केलें की जी माय बाप ॥३॥ मनाजी बखेडा झाला । गांव सगळा नाशिला की जी मायबाप ॥४॥ बुधाजी पाटील कायापूरचे । ममताईचे हाताखालचे । त्यांत जीवाजी भुलले की जी माय बाप ॥५॥ या उभयतांचा विचार वागला । त्यामुळें आम्हांस राग आला । बुधाजी आवरी आपल्या पोराला की जी माय बाप ॥६॥ सदगुरुचा मी पाडेवार । निवृत्तीशीं असे माझा जोहार । ज्ञानदेवा सफळ संसार झाला की जी माय बाप ॥७॥