भजनी मालिका
← भजनांकडे परत

जंव हंस काया नव जाय सांडोनी । तंव घेईं ठाकोनि रामनाम

janv hans kaya nav jay sandoni | tanv ghein thakoni ramanam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जंव हंस काया नव जाय सांडोनी । तंव घेईं ठाकोनि रामनाम ॥१॥ अंत काळवेळीं तुझें नव्हे कोण्ही । मी माझें ह्मणवूनि भु-ललासी ॥२॥ राहें निरंतर राघवाचे द्वारीं । तेणें भवसागरीं तरसी बापा ॥३॥ नवमास मायें वाहिलसि उदरीं । आस केली थोरी होशी ह्मणोनी ॥४॥ स्तनपान देऊनि मोहें प्रतिपाळीं । तेहि अंतकाळीं दूर ठाके ॥५॥ सर्वस्व स्वामिणी ह्मणवीतसे कांता । तेहि केश देतां रडतसे ॥६॥ ह्मणे म्यां मेल्याचें सुख नाहीं देखिलें । तेणे तंव पाळिलें अर्थें प्राणें ॥७॥ गाई घोडे ह्मैसी आणिक त्या दासी । धन त्वां सा-यासीं मेळविलें ॥८॥ तुझिया धनाला नाही पार लेखा । एकलचि मूर्खा जासी अंतीं ॥९॥ हातींच्या मुद्रिका कानींचे ते नग । करोनि लगबग काढिती वेगीं ॥१०॥ अंगींचीं लुगडीं फेडोनियां घेतीं । तुज बांधोनियां नेती यमदूत ॥११॥ भूमिभार झाला ह्मणती वेग करा । नातळती श-रीरा इष्ट मित्र ॥१२॥ स्मशाना नेऊनि भडाग्नि देऊनि । येती परतोनी सकळ जन ॥१३॥ एकलेंचि येणें एकलेंचि जाणें । पहा दृढ ज्ञानें विचारोनी ॥१४॥ पापपुण्य दोन्ही अंतींचीं सांगाती । येरें तीं राहती जेथिंचीं तेथें ॥१५॥ ऐसा हा संसार माया वेष्टियला । ह्मणोनि दुर्‍हाविला योगीजनीं ॥१६॥ विष्णुदास नामा विनवीतसे तुह्मां । झणीं परब्रह्मा विसरूं नका ॥१७॥