भजनी मालिका
← भजनांकडे परत

होतें लेउनियां आतींचे अंजन । तेणें देखिलें वो निक्षेपीचें धन । होतें वेदरायें ठेविलें जोडून । तेंचि सांपडलें आईतें निधान वों

hoten leuniyan atinche anjan | tenen dekhilen vo nikshepichen dhan | hoten vedarayen thevilen jodun | tenchi sampadalen aiten nidhan von

रचनाकार: संत निळोबा · अभंग
होतें लेउनियां आतींचे अंजन । तेणें देखिलें वो निक्षेपीचें धन । होतें वेदरायें ठेविलें जोडून । तेंचि सांपडलें आईतें निधान वों ॥१॥ जनीं जनार्दन प्रत्यक्षचि होता । तोचि मुसावोनि कृष्ण झाला आतां । मंडित चतुर्भज वेणुवाजविता । मुकुट कुंडले वो माळाचा मिरवता वो ॥२॥ प्रगट असोनियां न दिसेचि कोणा । आड आलिया वो बुध्दीचीं कल्पना । जाय हरपोनी अविदयेच्या भावना । तेणेंचि न देखती भूतीं भगवाना वो ॥३॥ कैसा मायामोह भ्रम झाला गाढा । तेणें जाणीवची धावें पुढा पुढा । विधिनिषेधाचा माझारी झगडा । तेणें अंतरला न सांपडे मूढा वो ॥४॥ इंद्रियां विषयाची सदा लगबग । मातले अहंकार काम क्रोध मांग । मदमत्सराचे धांवती निलाग । तेणें हातींच्या हातीं अंतरला श्रीरंग वो ॥५॥ ऐसें चुकवुनी आघात अपार । आजी सांपडले आईते भांडार । तेणें झालिये वो निजसुखें निर्भर । निळा म्हणे भोगुं सुखाचे संभार वो ॥६॥