भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोणाई म्हणे नाम्या वचन माझें ऐक । पोटींचें बाळक म्हणोनि सांगे

gonai mhane namya vachan majhen aik | potinchen balak mhanoni sange

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोणाई म्हणे नाम्या वचन माझें ऐक । पोटींचें बाळक म्हणोनि सांगे ॥१॥ महिमेचा संसार सांडोनि आपुला । संग त्वां धरिला निःसंगाचा ॥२॥ या काय मागसी तो काय देईल । शीघ्रची नेईल वैकुंठासी ॥३॥ सविल्याचीं लेंकुरें वर्तताती कैसीं । तूं मज जालासी कुळक्षय ॥४॥ धनधान्य पुत्र कलत्रें नांदती । तुज अभाग्याचे चित्तीं पांडुरंग ॥५॥ शिवण्या टिपण्या घातलेंसें पाणी । न पाहासी परतोनि घराकडे ॥६॥ कैसी तुझी भक्ती या लौकिकावेगळी । संसाराची होळी केली नाम्या ॥७॥ याची तुवां कैसी धरियेली कांस । हा तंव कवणास जालाअ नाहीं ॥८॥ त्यातें जे अनुसरती त्याचें नुरे कांहीं । देव नव्हे पाही हा घरघेणा ॥९॥ गोकुळीं करी चोरी आपुलें पोट भरी । यो तुज निर्धारीं देईल काई ॥१०॥ लक्षुमीसारिखी सुंदर टाकोनी । ताटिका गौळणी गौळीयांच्या ॥११॥ अष्टसिद्धी दासी जयाच्या कामारी । कल्पवृक्ष द्वारीं कामधेनु ॥१२॥ बळीच्याचि घरा भीक मागूं गेला । धरूनी बांधिला दारवंटा ॥१३॥ कुबज्या कुरूप कंसाचिया दासी । जीवें भावें तिसी रतलासे ॥१४॥ यातें भजती त्याच्या संसाराची नासी । जडला जीवेंसी नवजाय ॥१५॥ ठकोनियां येणें बहु नाडियेलें । तैसें तुज जालें सत्य जाण ॥१६॥ गोणाई म्हणे नाम्या बरें नाहीं केलें । घर बुडविलें कुळासहित ॥१७॥