भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेऊनियां गुरू आले राजसभे । वंदूनियां उभे सन्मुख तो

gheuniyan guru ale rajasabhe | vanduniyan ubhe sanmukh to

रचनाकार: संत नामदेव · अभंग
घेऊनियां गुरू आले राजसभे । वंदूनियां उभे सन्मुख तो ॥१॥ ह्मणे काय पढसी तूं सांग । म्हणे लागूं वेगें हरीहरी ॥२॥ ऐकतां वचन बोले क्रोधावोनि । पापीयासी झणी नका येथें ॥३॥ माझा जो वैरी तया आठवितो । कुळघात होतो ऐशानेंचि ॥४॥ म्हणूनि समुद्रीं नेऊनियां टाका । अग्नींत लोटा कां दुराचारी ॥५॥ शस्त्रघाव वरी मारारे अधम । काळाग्नीते सम विष पाजा ॥६॥ पर्वतावरी नेऊनियां टाका । प्राण याचा घ्या कां अवघे दूत ॥७॥ राजआज्ञा होतां संकोचित दूत । राजा बोले त्यांतें काय पाहतां ॥८॥ दूतीं राजाज्ञेनें धरुनि हो नेतां । मुखीं त्या अनंता आठवितो ॥९॥ तयेकाळीं भक्त उभा निर्भय चित्त । काय हो करीत हरि माझा ॥१०॥ नेऊनियां तिरी समुद्राचे पाहीं । म्हणती आतांही ऐक बापा ॥११॥ येरु म्हणे हरि असे नारायण । तो मज लागून तारील हो ॥१२॥ टाकितां उदकीं वरतीच राहे । म्हणती हा पाहें पोहतसे ॥१३॥ तेथूनि काढितां अग्नींत टाकीला । शीतळ हो झाला अग्नी स्पर्शें ॥१४॥ हरिदासा काय शक्ति हो जाळाया । म्हणोनियां पायां वंदितसे ॥१५॥ मुखीं हरिहरि उच्चार नामाचा । गर्जे भक्त साचा सर्वांठायीं ॥१६॥ अग्नि तो शीतळ होतां मात राया । म्हणे जादु केली याद दुर्जनानें ॥१७॥ विष हळाहळ करुनियां वाटी । नेऊनियां होटीं लाविताती ॥१८॥ भोक्ता नारायण म्हणोनियां त्याला । अमृत तो झाला प्रल्हादासी ॥१९॥ पर्वंत शिकरीं बैसऊनि खालें । लिटितां हो बोले सर्व सत्ता ॥२०॥ जळीं स्थळीं व्यापि आहे नारायण । तेथें काय होणें भय दु:ख ॥२१॥ पडतांचि खालीं उठोनियां उभा । पाहतां हो सभा भय दु:ख मानी ॥२२॥ म्हणे मारा याला शस्त्रघाय वरी । धांवोनियां चिरी महाबळें ॥२३॥ हाणितां शस्त्रानें न लगती कांहीं । मुखीं हरि पाही आठवीत ॥२४॥ म्हणे गजपायीं बांधोनियां मारा । कुंजर ते आणा बोले राजा ॥२५॥ आणोनियां हत्ती घालीत हो वर । पाहे तो समोर विक्राळ सिंह ॥२६॥ दाहि दिगंतर उलंघुनी गेले । उपाय न चाले कांहीं त्यासी ॥२७॥ श्रमयुक्त झाळा राजा कांहीं केल्या । भक्त राजा भला न ढळेचि ॥२८॥ नामा म्हणे भक्त निर्भय सर्वांसी । काय हो तयासी उपेक्षी हरी ॥२९॥