भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरीं आपुलिया मातेपाशीं । देखोनियां मागें शशी । म्हणे देंईवा खेळावयासी । आणूनी तो मज हातीं

gharin apuliya matepashin | dekhoniyan magen shashi | mhane deniva khelavayasi | anuni to maj hatin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
घरीं आपुलिया मातेपाशीं । देखोनियां मागें शशी । म्हणे देंईवा खेळावयासी । आणूनी तो मज हातीं ॥१॥ येरी म्हणे परिसे ताता । गगनींचा तो नये हाता । नको छळूं रे कृष्णनाथा । नाहीं तेंचि मागों नको ॥२॥ येरुं म्हणे रे पैल दिसे । नाहीं त्यासी म्हणसी कैसें । येरे म्हणे असाध्य तें असें । नाहींपणाचि सारिखें ॥३॥ राया घरींची संपदा । दुर्बळा घरीं कैंची सदां । येरु हांसोनियां गदगदां । मुखचंद्रातें दाखवितु ॥४॥ म्हणे पाहे दसवंतिये । हा गे जवळींच चंद्र आहे । तारे तुटती लवलाहे । षोडशकळीं प्रकाशला ॥५॥ यशोदा म्हणे न कळे महिमा । तुझा आम्हां पुरुषोत्तमा । दिठावसील रे मेघ:शामा नको विंदाने करुं ऐशीं ॥६॥ निळा म्हणे ओंवाळून । सांडी वरुनी निंबलोण । मग त्या वोसंगा घेऊन । म्हणे भोजन करीं बापा ॥७॥