भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळुले सिणले पाहता वाटुली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं

dolule sinale pahata vatuli | avastha datali hradayamajin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
डोळुले सिणले पाहता वाटुली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥१॥ तूं माझी जननी सखिये सांगातिणी । विठ्ठले धांवोनी देई क्षेम ॥२॥ तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरलीसी ॥३॥ तूं माझी कुरंगिणी मी तुझें पाडस । गुंतलें भवपाश सोडी माझा ॥४॥ मी तुझें वच्छ तूं माझी गाउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥५॥ नामा म्हणे माझी पुरवावी आस । पाजी तान्हुल्यास प्रेमपान्हा ॥६॥