भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानियांचें ज्ञेय ध्यानियांचे ध्येय । पुंडलिकाचें प्रिय सुख वस्तु

dnyaniyanchen dnyey dhyaniyanche dhyey | pundalikachen priy sukh vastu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानियांचें ज्ञेय ध्यानियांचे ध्येय । पुंडलिकाचें प्रिय सुख वस्तु ॥१॥ तें हें समचरण उभें विटेवरी । पहा भीमातीरीं विठ्ठल रूप ॥२॥ जें तपस्वियांचें तप जें जपकांचें जाप्य । योगि-यांचें गौप्य परम धाम ॥३॥ जें तेजकांचें तेज जें गुरु मंत्राचें गुज । जें पुजकांचें पूज्य कुळदैवत ॥४॥ जें जीवनांतें जीववितें पवनातें निववीतें । जें भक्तांचें उगवितें माया जाळ ॥५॥ नामा ह्मणे तें सुखची आयतें । जोडलें पुंडलि भाग्य योगें ॥६॥