भजनी मालिका
← भजनांकडे परत

धामणगांवामध्यें माणकोजी बोधला । आवडे देवाला प्राणाहुनी

dhamanaganvamadhyen manakoji bodhala | avade devala pranahuni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धामणगांवामध्यें माणकोजी बोधला । आवडे देवाला प्राणाहुनी ॥१॥ विठोबाचे नामीं रंगलें हें मन । मिळालें जीवन सिंधुमाजी ॥२॥ आवडीनें केला त्याणें अंगिकार । कृपेचा सागर पांडुरंग ॥३॥ गुणदोष त्याचे न पाहे चक्रपाणी । बोलिले पुराणीं व्यासादिक ॥४॥ सत्य हेंचि असे सांगतों प्रमाण । भावे करा ध्यान विठोबाचे ॥५॥ तैसा बोधराज प्रेमळ हा भक्त । भावें आठवीत देवाजीसी ॥६॥ रात्रीं शेतामाजी करीत रक्षण । गात नारायण आवडीनें ॥७॥ राळरास त्याच्या सासर्‍याचा गांव । त्याची याची सींव एक असे ॥८॥ तयाचिया घरीं हांसी कुणबीण । करीत रक्षण शेतामाजी ॥९॥ बोधराज भावें आळवीत देव । हांसीचिया जीवा सुख वाटे ॥१०॥ विठोबाचे नामीं वेधलेंसे मन । आली ती शरण बोध राजा ॥११॥ म्हणे बापा मज द्यावा उपदेश । तोडावा हा फांस संसाराचा ॥१२॥ हांसीचा तो भाव जाणुनी पवित्र । सांगितला मंत्न त्रिअक्षरी ॥१३॥ विठ्ठल हें नाम अहोरन ध्याईं । मग तुला नाहीं भय चिंता ॥१४॥ हरिदिनिं व्रत करीं एकादशी । जागर कथेसी करीत जावा ॥१५॥ हांसीचिया मना झाला तो आनंद । भावें हा गोविंद आळवी ती ॥१६॥ चालवीत व्रत नेम एकादशी । जागर कथेसी धामणगांवीं ॥१७॥ बोधराज भक्त भाविक प्रेमळ । कीर्तन रसाळ आवडीचें ॥१८॥ श्रवणासी ते येती गांवीचे ते लोक । वाटतसे सुख तयालागीं ॥१९॥ भवर गांवीचे कीर्तनास आले । त्यांत काय झालें एक एका ॥२०॥ मार्गीं चालतांना सर्पदंश झाला । तेचि वेळां गेला प्राण त्याचा ॥२१॥ सांगात्यांनीं तेव्हां विचार करुनी । आणियेला त्वरें कथेमाजी ॥२२॥ बैसविलें त्यासी भिंतीसी टेकुनी । करिती श्रव्ण हरिकथा ॥२३॥ नामामृत भावें वाढीत बोधला । घ्यारे सर्वत्नांला सांगतसे ॥२४॥ करावी पुरती तुम्ही सांठवण । जगीं हें भरूनि उरलेंसे ॥२५॥ स्वर्ग मृत्युलोकीं असे तो पाताळीं । आणिला जवळीं पुंडलीकें ॥२६॥ समपदीं कटीं ठेऊनियां कर । उभे विटेवर राहिले ते ॥२७॥ तयाची हे गोडी बोधल्या संपडली । तेचि म्यां वाढिली तुम्हांपुढें ॥२८॥ श्रवणद्वारें तुम्ही जेवा सावकाशा । होईल उल्हास माझे जीवा ॥२९॥ नामघोष तुम्ही वाजवावी टाळी । होईल हे होळी पातकांची ॥३०॥ श्रोते बोलताता तेव्हां बोधल्यास । करा उपदेश या गृहस्थासी ॥३१॥ वाजवीना टाळी करीना भोजन । कांहो यानें मौन्य धरियेलें ॥३२॥ बोधराज करी त्यासी विनवणी । बोला चक्रपाणी आवडीनें ॥३३॥ कथेलागीं तेव्हां येती आनंदानें । कांपे तया भेणें कळीकाळ ॥३४॥ सांडूनि अहंता यावें कीर्तनासी । तेणें हृषिकेशी संतोषतो ॥३५॥ म्हणेनिया कोणीं न करावा आळस । बोलावा उल्हासें पांडुरंग ॥३६॥ ऐकोनियां ऐसें तेव्हां नारायण । परतविला प्राण तेचि वेळां ॥३७॥ कथेमाजी जें कां बैसविलें प्रेत । तें आनंदें नाचत नामघोषें ॥६८॥ समजलें तेव्हां श्रोत्यां त्या सकळां । महिमा आगळा हरिनामाचा ॥३९॥ बोधल्यासी तेव्हां श्रुत झाली मात । उठविलें प्रेत पांडुरंगें ॥४०॥ प्रेमअश्रु बोधल्याचे डोळां । पाळिसी तूं लळा पांडुरंगा ॥४१॥ जाणूनि अंतर होसी साहाकारी । लज्जा त्वां श्रीहरि राखियेली ॥४२॥ बाळकाचे बोल मातेसी आवड । पुरवीत कोड आनंदानें ॥४३॥ समजलें मज आतां विठाबाई । काय उतराई होऊं तुज ॥४४॥ बोधल्यासी बोले विठोबा सांवळा । आवडी प्रेमला तुई मज ॥४५॥ आनंदें जागर होत एकादशी । किर्तनांत हांसी होती तेव्हां ॥४६॥ हांसीचे ते धनी विभक्त ते झाले । विकरा घातिलें हांसीलागीं ॥४७॥ हांसीलागीं तेव्हां श्रुत झाली वार्ता । खेद करी चित्ता आपुलिया ॥४८॥ काय जन्मांतर कैसें हें प्राक्तन । स्वामीचे चरण अंतरती ॥४९॥ बोधराज माझी पांडुरंग मूर्ती । वाटेल ही खंती त्याचि मज ॥५०॥ होऊनियां श्रमी धामणगांवा गेली । वार्ता सांगितली बोधराजा ॥५१॥ बाबा तुम्ही आतां द्यावें मज मोल । श्रुत तेव्हां केलें ममताईसी ॥५२॥ जाणूनि अंतर राळेरास आला । मेहुण्यास बोले बोधराज ॥५३॥ हंसिसी विकितां म्हणूनि ऐकिलें । सांगा इचें मोल काय आतां ॥५४॥ येरूं म्हणे हांसी देऊं आणिकासी । देऊं ना तुम्हासी बोलूं नका ॥५५॥ हांसीलागीं तेव्हां श्रुत झाली वार्ता । खेद करी चित्ता आपुलिया ॥५६॥ बोधराज तेव्हां श्रुत झाली वार्ता । सांगतों देवासी नेतील तुजा ॥५७॥ सांगूनियां ऐसें धामणगांवा गेले । तों हांसीलागीं आलें गिर्‍हाईक ॥५८॥ पंचवीस होन केलें तिचें मोल । लिहून घेतलें खरिदखत ॥५९॥ द्रव्य घातियेलें तयाच्या पदरांत । तों आले अकस्मात्‌ पांडुरंग ॥६०॥ हांसे तुललागीं बोलावी बोधला । शब्द हा ऐकिला सर्वत्रांनीं ॥६१॥ हांसी आणि मूल तेव्हां जालें गुप्त । केला हा वृत्तांत पांडुरंगें ॥६२॥ बोलावितां हांसी न दिसे तयाला । कज्जा तो लागला दोघांजणा ॥६३॥ भांडत हे गेले तेव्हां दिवाणांत । सांगती वृत्तांत दोघेज्ण ॥६४॥ फजीत होऊनि तेव्हां दरबारीं । दिल्हें तें माघारी द्रव्य त्याचें ॥६५॥ संताचें नायके नाडला तो खर । दोहींकडे थार नाहीं त्यासी ॥६६॥ संतांसी शरण असे दास नामा । अखंडित प्रेमा त्याचे नामीं ॥६७॥