भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुझी अवज्ञा घडे । तयाचे दास होती वांकुडे

deva tujhi avadnya ghade | tayache das hoti vankude

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा तुझी अवज्ञा घडे । तयाचे दास होती वांकुडे । व्याधिविण देह पीडे । बुडे सागरीं चितेच्या ॥१॥ देवा तूं होसी उदासीन । तरी हांसती सकळैक जन ॥२॥ देवा तूं नाहींस जयाचेंज चित्तीं । सोनें धरिल्या होये माती । पीक न पिके तयाचे शेतीं । पेंवीं पाणी रिघतसे ॥३॥ सेवा करी जयाचे घरीं । तींचि होतीं पाठमोरीं । इष्टमित्र सज्जन सोयरीं । आप्त वैरी होऊनि ठाके ॥४॥ ठेवा ठेविला चुके आपण । मागतोचि मागे जाण । सत्यास घडे आपदास्तपण । बोले तितुकें लटिकेची ॥५॥ ऐसा अनुभव घडला मज । म्हणोनि बा शरण आलों तुज । नामा म्हणे केशिराज । कृपा करीं दातारा ॥६॥