भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखोबाचीकांता असे ती गर्भिण । झाले तीस पूर्ण नव मास

chokhobachikanta ase ti garbhin | jhale tis purna nav mas

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चोखोबाचीकांता असे ती गर्भिण । झाले तीस पूर्ण नव मास ॥१॥ करूनि विनंति पतिसी बोलत । असावें साहित्य घरामाजी ॥२॥ ऐकूनियां चोखा करीत विचार । कोणें ऐसा घोर वागवावा ॥३॥ न पुसतां गेला बहिणीच्या गांवा । आनंदें केशवा आळवीत ॥४॥ दोन प्रहर झाले न येती भोजना । कांता विचारणा करीतसे ॥५॥ शोध करितांना संध्याकाळ झाला । पति माझा गेला कोणीकडे ॥६॥ विरक्तासी मी तों सांगितलें काम । कैसा झाला भ्रम माझे बुद्धि ॥७॥ अहो पांडूरंगा आणा त्यासी आतां । न सांगें मी वार्ता संसाराची ॥८॥ झाली तेव्हां श्रमी प्रसूत वेळा आली । विठाई धांवली तेचिवेळां ॥९॥ चोखोबाची बहिण झाला सारंगधर । वहिनी उघडा द्वार हांका मारी ॥१०॥ दोघीही भेटल्या तेव्हां आनंदानें । आलें तें रुदन चोख्याकांते ॥११॥ बरें बाई तुम्हां देवानें धाडिलें । पती माझा गेला कोणीकडे ॥१२॥ चाणाक्ष बायका तुम्ही अनिवार । अज्ञान भ्रतार तुमचे गांवीं ॥१३॥ म्हणोनियां तुम्ही सांगतां त्या काम । विरक्तासी श्रम वाटतसे ॥१४॥ दादा माझा सुज्ञ आधींच हें श्रुत । होयाचें तें होत आपणची ॥१५॥ केली त्वां सूचना आला माझ्या घरा । त्यानें केळी त्वरा मजलागीं ॥१६॥ सर्वहि साहित्य दिलें म्हणे आतां । नका करूं चिंता वहिनी कांहीं ॥१७॥ सर्वहि साहित्य होतें तिजपाशीं । रिद्धीसिद्धि दासी तयाचिया ॥१८॥ प्रसूत ते झाली पुत्र झाला तिला । आनंद वाटला पांडुरंगा ॥१९॥ वांटिली शर्करा सर्वत्र यातीसी । माझ्या चोखोबासी पुत्र झाला ॥२०॥ लावूनि उटणें न्हाणियेलें तिला । श्रम तिचा गेला सर्वांगाचा ॥२१॥ पांचवीही केली तिनें आनंदानें । घातलें भोजन यातीलागीं ॥२२॥ तेरावे दिवशीं वाळ ते पाळणां । घालितसे राणा वैकुंठींचा ॥२३॥ साडी आणि चोळी आंगडें टोपरें । आणियलें कोणें रखमाईनें ॥२४॥ वोलावूनि सुवासिनी पाळणां घातलें । नाम तें ठेविलें कर्मामेळा ॥२५॥ बारसेंहि केलें तिनें आनंदानें । घातलें भोजन सर्वयाती ॥२६॥ चोखोबासी मास झाला बहिणी घरीं । विचारी अंतरीं चोखा तेव्हां ॥२७॥ सोडोनियां आलों प्रपंचाचे भयें । अंतरले पाय देवाजीचे ॥२८॥ सद्नदित झालें तयाचें अंतर । प्रेम अश्रुनीर वाहे डोळां ॥२९॥ येतों बाई आतां कृता असों द्यावी । सांगोन पाठवीं आपल्या हातें ॥३०॥ आतां जातें वहिनी आपुल्या गांवाला । रागें भरतील मला धनी माझे ॥३१॥ ऐकूनियां बोले चोखोबाची कांता । नका जाऊं आतां बाई तुम्ही ॥३२॥ येऊंद्या घरधनी करतील बोळवण । काय मी उत्तीर्ण होऊं आतां ॥३३॥ काय काय आठवूं तुमचे उपकार । न पदे विसर जन्मोजन्मीं ॥३४॥ दादा माझा असे पांडुरंग भक्ता । सदा त्याचें चित्त देवावरी ॥३५॥ मान्य करीं वहिनी तयाचें वनच । तेणेंचि कल्याण असे तुमचें ॥३६॥ सद्रदित झालें दोघींचें अंतर । प्रेम अश्रुनीर वाहे डोळां ॥३७॥ सांभाळीं हा आतां माझा कर्ममेळा । येईल चोखामेळा घरीं आतां ॥३८॥ थांबा बाई आतां शिंवितें मी चोळी । नगे वनमाळी बोलतसे ॥३९॥ पुसोनि सर्वांसि गेला तो सांवळा । आला चोखामेळा घरालागीं ॥४०॥ येवोनियां कांता वंदीत चरण । दिलें उचलोन बाळ हातीं ॥४१॥ बाई आतां गेल्या भेटल्या वाटेसी । खंती या जिवासी वाटे त्याची ॥४२॥ सांगितल अत्यासी सकळ वृत्तांत । सद्नदित चित्त चोखा झाला ॥४३॥ कैंची बाई येथें आले पांडुरंग । धन्य तुझें भाग्य भेटी झाली ॥४४॥ सद्नदित झालें दोघांचें अंतर । प्रेम अश्रुनीर वाहे डोळां ॥४५॥ भक्तांसी संकट पडों नेदी देव । घालीतसे धांव त्यांच्या काजा ॥४६॥ विष्णुदास नामा वंदी त्याचे चरण । वर्णितसे गुण वारंवार ॥४७॥