भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालती कुळवाडी नटके । उपकें घेतलीसें नाके

chalati kulavadi natake | upaken ghetalisen nake

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चालती कुळवाडी नटके । उपकें घेतलीसें नाके । चार वर्षें पिकलें निकें । त्यांचे कण सांचले ॥१॥ पुढें एक विपाणीक पडिलें । त्या कणाचें द्रव्य सांचलें । कृपणाचें घर भरिलें । बंचल झाला भक्तांसी ॥२॥ स्त्रियांबाळां खाऊं नेदी । धर्म न करीच निशुद्धी । डोईस बांधलीसे चिंधी । खांदीं रकटें ठिगलांचें ॥३॥ त्या द्रव्याचें करी कळांतर लेखा । सजगाणीस देई रुका । रुक्यास घेई पैका । आठा दिवसांच्या बोला ॥४॥ सबाई दिडि दुणी । अकर्ताच घरीं आणी । तो न भजे चक्रपाणी । पाप धुणी होतसे ॥५॥ तंव एक अतीत घरासी आला । बाईलीनें त्यासी स्वैंपाक केला । तंव आपण उठून जागला । झडकरी आला द्वारासी ॥६॥ कोणें दाखविलें माझें घर । त्यावरी घेईन जहर । कोठें गेला सुना मोगर । अरगळा कोणें काढिली ॥७॥ ऐसा तो ब्राह्मण चड्फडत गेला । आपण परतोन माघारा आला । धांवोनी घाव हाणितला । डोई फोडिली बायलेची ॥८॥ कैसी केली बोहरी । बोज नाहीं तुझे घरीं । नागविलें इया पोरीं । तीनवेळां खाताती ॥९॥ ऐसी गजबज ऐकोन । शेजारी आला धांवोन । त्यासी हातीं धरोन । गृहाभितरीं हिंडविला ॥१०॥ त्यासी बैसावया दिला पिढा । तों स्वैपाक आणोनी ठेविला पुढां । पहा हो बायलेचा धाडस केवढा । ऐका तुम्ही दादोजी ॥११॥ ऐसीं पूर्ण अकरा वर्षें भरलीं । बारा वर्षांची साउली पडली । या रीतीनें गुजराण झाली । तंव अग्नि लागला गृहासी ॥१२॥ शेतांतून कुळवाडें केली चोरी । पाणी निघालें पेवा भीतरी । सुनेनें घालून घेतलें विहिरीं । ऐसेपरी नागवलो ॥१३॥ ऐसे जे नर असती । ते जन्मोजन्मीं नागवती । त्यांची न चुके यातायाती । विष्णुदास म्हणे नामा ॥१४॥