भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हांड जयाच्या पोटीं सांठवलें । तेंचि साकारलें ध्रुवापाशीं

bramhand jayachya potin santhavalen | tenchi sakaralen dhruvapashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्रम्हांड जयाच्या पोटीं सांठवलें । तेंचि साकारलें ध्रुवापाशीं ॥१॥ कैसें तें बोलावें कैसें तें वानावें । वेदासही ठावें नोहे जेकां ॥२॥ निलोत्पल रवि गगनाही हिनावी । ऐसी शोभा दावी इंद्रनीळ ॥३॥ मरगजालागीं जोडलें सौरभ्यें । आनंदाचे कोंब चारी भुजा ॥४॥ मुगुट कुंडलें सर्वांगीं भूषण । लेणीयासी लेणें अंगाचिया ॥५॥ इंद्रधनुष्याची मांडणी मेघाची । माळ वैजयंतीची गळां रुळे ॥६॥ कस्तुरी कपाळीं रेखलीसे भाळीं । उटी ते पिवळी सर्वांगासी ॥७॥ सायुध सुंदर शोभताती कर । प्रभा ते अपार कोंदाटली ॥८॥ अभय हस्त एक पुढें तुकावला । आपुल्या भक्ताला सांभाळाया ॥९॥ गोजिरी गोमटी ध्यानीं उभी ठेली । नामया माउली माथा ठेवी ॥१०॥