भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्ह आणि गोवळपणें

bramha ani govalapanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ब्रम्ह आणि गोवळपणें । यज्ञ भोक्ता आणि उच्छिष्ट खाणें । महर्षिस्तव आणि हुंबरी घेणें । नाटकी विंदानें अघटित ॥१॥ नित्यमुक्त आणि बांधला गळा । परात्पर आणि कोंडिती बाळा । ब्रम्हचर्य आणि सहस्त्र सोळा । भोगिल्या अबळा आणिखीही ॥२॥ असुरमर्दन आणि मारिती गौळणी । लक्ष्मीकांत आणि चोरितो लोणी । ईशाचा ईश आणि फोडितो दुधाणीं । गुणातीत अगुणी भरलासे ३॥ विश्वव्यापक आणि यशोदे कडिये । शुकाचें ध्यान आणि दासी पिढिये । कृपावंत आणि मारिली माये । रडे ये माये ये माये लटिकाचि ॥४॥ रोमीं ब्रम्हांडे आणि बाळक झाला । आतुर्बळी आणि उखळी बांधिला । बळीचा व्दारपाळ आणि पंढरियें आला । पुसतांचि याला नाहीं कोणी॥५॥ सखा भावाचा आणि मामासीचि मारी । धर्मस्थापक आणि अकर्मे करी । देहातीत आणि आयुधें धरी । अकर्ता करी मना आलें ॥६॥ सर्वज्ञचि आणि नेणता झाला । काळाचाहि काळ आणि बाऊसि भ्याला । माउशीचे स्तनीं विषचि प्याला । उत्तीर्ण तिये झाला जीवघातें ॥७॥ अरुप आणि घेतलीं सोंगें । निष्काम आणि गौळणी मागें । नित्य तृप्त आणि गोवळसंगे । नित्य उच्छिष्टें खाय त्यांची ॥८॥ भूपति आणि मंत्री माकडें । अर्धांगी नोवरी आणि नेली म्हणून रडे । नावा सांडुनी तारितो दगडें । वनवासी उघडें फळें भक्षी ॥९॥ अमरां पूज्य आणि राखितो गाई । क्षिराब्धीचा जामात आणि घोंगडें डोई । ईशाचा ईश आणि लोळतो भुई । नंदाचे गोठणीं गाईवाडा ॥१०॥ सनकादिक देव स्तविती भावें । तो हा लंपट गौळणीसवें । न मागती त्यांसी देऊचि धांवे । आणि मागत्यासी व्हावें अतिकृपण ॥११॥ जगदानी आणि भिकारी झाला । विराटरुपी आणि खुजट ठेला । त्रिपाद देतां त्रैलोक्य नेला । शेखीं बळीनें बांधला व्दारदेशीं ॥१२॥ नित्य पूर्ण आणि भोजन मागे । बाळकाचि दात्याचें कांपवी अंगे । न जेवितां सवें पळोचि लागे । मग धांवे त्यामागें विमानीं घालीं ॥१३॥ दयावंत आणि अंगींच चिरलें । मयोरध्वजाचीं केलीं शकलें । उदार कर्णाचे दांतचि पाडिले । शिबीतें सोलिले कपोतासाठीं ॥१४॥ ब्राम्हणभक्त आपणा म्हणवी भला । आणि नारदाची नारदी करुनी ठेला । सख्ये बहिणीची भीड नाहीं याला । जांबळाच्या निमित्यें केला उपहास ॥१५॥ वेदांसी स्तवितां उगाचि बैसे । आणि गौळणीच्या शिव्या ऐकोनि हांसे । नित्यानंद आणि रडतचि बैसे । आळी घेउनी मिसे जेवणाच्या १६॥ निळा म्हणे हा लाघवी हरी । कांहींही न करुनी अवघेंचि करीं । भक्तां व्देषियां एकेचि परी । निंदा स्तुतीवरी सम देणें ॥१७॥