भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रतारें टाकिलें मोट बांधोनिया

bhrataren takilen mot bandhoniya

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
भ्रतारें टाकिलें मोट बांधोनिया । न सोसी ते तया क्लेशावस्था ॥ १ ॥ चतुर्थ दिवशीं जीव टाकियेला । विठ्ठलें दाविला चमत्कारु ॥ २ ॥ ब्राह्मणाच्या रूपें येवोनी सांगत । सावधान चित्त करीं पुढें ॥ ३ ॥ अंतरीं सावध होउनी राहिलें । चित्त म्यां गोविलें तुकोबासी ॥ ४ ॥ वत्स गेलीयासी दिवस सातवा । येवोनी तुकोबा स्वप्नामाजीं ॥ ५ ॥ केले समाधान पाजिलें अमृत । वत्सासी करीत गाय भेटी ॥ ६ ॥ अमृता पाजोनी सांगितला मंत्र । जो कां हा सर्वत्र लोक जपती ॥ ७ ॥ मस्तकीं हस्तक ठेवोनिया कृपा । केली त्या स्वरूपा तोची जाणे ॥ ८ ॥ कृपेचा महिमा आहे तो अपार । वत्स बोले सार श्लोकअर्थ ॥ ९ ॥ आठवे दिवशीं सावध इंद्रियें । अमृतें धालिये तुकोबाच्या ॥ १० ॥ तेधवां ती गाय देखिली सन्मुख । निमालीसे देख वत्स कळे ॥ ११ ॥ म्हणे या वत्सातें पाजिलें अमृतु । तयासी तो मृत्यु कदां नोहे ॥ १२॥ अमर तें वत्स आहे मजपासीं । चित्त अमृतासी घेत गोडी ॥ १३ ॥ बहिणी म्हणे इतुकें वर्तलीयावरी । पुढेंही विस्तारीं सांगिजेल ॥ १४ ॥