भजनी मालिका
← भजनांकडे परत

भिन्न रात्रीं माध्यान्ही वो । सेजे सुदली नारी । आपआपणा विसरूनियां । सुशोभित अंधारीं

bhinna ratrin madhyanhi vo | seje sudali nari | apaapana visaruniyan | sushobhit andharin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भिन्न रात्रीं माध्यान्ही वो । सेजे सुदली नारी । आपआपणा विसरूनियां । सुशोभित अंधारीं ॥१॥ त्यामाजी चारी भुजा । शंख चक्र वो करीं । पद्म गदा हातीं शोभती । दिसे सर्व शृंगारीं ॥२॥ येऊनि हंस तुळीके । कैसें धरियलें करीं । देऊनि आलिंगन । वोरसलें वो दुरी ॥३॥ पालवीं धरितां धरितां । निघाला बाहेरी । त्यालागीं प्राण जातो । भेटवा झडकरी ॥४॥ कवण ते प्राण सखी । भेट करील विठोसी । सांडूनि वीरगुंठी । चरण झाडीन केशीं ॥५॥ कवण मी कैंचा नेणें । जाती कुळ तयाचें । कवणा पासाव झाला । तें मी नेणें वो साचें ॥६॥ इंद्र चंद्र नीळ कीळ । घन नभ रूप तयाचें । चरणीं तोडर रुळे । वरी नेपूरें साचे ॥७॥ नख चंद्रमंडीत वो । जन्मस्थान गंगेचें । जानु जघन नीट । पीतांबर वो कासे ॥८॥ त्यावरी नाग मुरडी । रत्न मेखळा साजे । माजू जो मुष्टी माय । त्या मन वेधलें माझें ॥९॥ नाभीं सरोवरीं वो । दिसे ब्रम्हकमळ । अनुपम्य उदर ज्याचें । विशाळ वक्षस्थळ ॥१०॥ कौस्तुभ वरी शोभे । करितो झळफळ । कुंडलांचेनि रत्नें । कैसेनि फांकताती कीळ ॥११॥ वदनीं मी काय वानूं । प्रसिद्ध निर्मळ । भाळीं तो अर्ध चन्द्र । मृगनाभींचा टिळ ॥१२॥ सरळ ज्या अंगोळिका । नवरत्नें जडीत । कंकणें मनगटीं । बाहुवटी सुशीभित ॥१३॥ त्यावरी कीर्ति मुखें । भुजादंड मिरवत । वैजयंती पदक हिरे । मुगुटीं झळकत ॥१४॥ मयूरपत्रें शिरीं । शोभा दिसे अमित । चंद्र मंडळ लोपलीं वो । महातेज अद्‌भुत ॥१५॥ व्यापिलें वनमाळीय़े । लावण्य तेज अमित । तें रूप देखावया । माझा जीव उल्हासत ॥१६॥ ऐसी तापली विरहज्वरें । थोर होतो उवारा । चंदन पोळतसे । न घाला विंजण वारा ॥१७॥ चंद्रमा दाहतसे । उष्ण तो खडतरा । तंव येरी जाणितला । वेध नंदकुमरा ॥१८॥ होईल केशीराजा । पाहे द्वारकापुरा । भक्ति ही विरहा माता । तिणें आणिला घरा ॥१९॥ नामया विष्णुदासा । भेटी शारंगधरा । तनु मन जीवें त्याला । सुख झालें अंतरा ॥२०॥