भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तां समागमें हरी । सत्वर आले संवत्सरीं

bhaktan samagamen hari | satvar ale sanvatsarin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तां समागमें हरी । सत्वर आले संवत्सरीं । ब्रह्मानंद परोपरी । चरण धरी सोपानदेव ॥१॥ भागीरथी सवें सरिता । धावोनि आली गंगा माता । यमुना सरस्वती उभयतां । एकात्मता कर्‍हेमाजीं ॥२॥ इंद्र चेंद्र तेहतीस कोडी । नवनाथ सिद्ध सौंगडी । भक्त सनकादिक प्रौढी । वेद परवडी गर्जती ॥३॥ गगनामाजीं देवांगना । वर्षाव करिती दिव्यसुमना । म्हणे निवृत्तीनाथ सोपाना । चरणावारी ठेवी तूं ॥४॥ पुष्पकारुढ जाले देव । आणिक मागुती आले सर्व । पांडुरंग दैव सदैव । सोपानदेव बाळमूर्ति ॥५॥ इंद्रनीळ पर्वत आहे । तेथोनि ठाव जावया पाहें । सप्तपाताळीं शेष वाहे । दीर्घदेह फणी असे ॥६॥ जावोनी त्यासी श्रुत करावें । गरुडासि बोलिलें देवरावें । मार्गीं चालिला लवलाहें । क्रमित जावें सप्तपाताळीं ॥७॥ नामा म्हणे अमृतकरीं । मुख कुरवाळोनी श्रीहरी । सोपान समाधिभीतरीं । आपण पुढारीं बैसले ॥८॥