भजनी मालिका
← भजनांकडे परत

भागवंत म्हणे नामयासी । हें यथार्थ तूं बोलसी

bhagavant mhane namayasi | hen yathartha tun bolasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भागवंत म्हणे नामयासी । हें यथार्थ तूं बोलसी । परी क्षणक्षणा गुण आठवती मानसीं । या ज्ञानदेवाचे ॥१॥ भक्त ज्ञानि आणि वैरागी । ज्ञानदेवा ऐसा चहुंयुगीं । ना शको न देखो याची लागीं । खंती वाटे बहुत ॥२॥ उद्धवें चरणावरी ठेउनि माथा । कांही एक विनंति जगन्नाथा । ते सांगाअजी कृपावंता । गुज अंतरीचें स्वामी ॥३॥ निवृत्ति ज्ञान सोपानासि । हे बैसविले जी समाधीसी । मुक्ताताईची स्थिती कैसी । तें ह्रषिकेशी सांगावें ॥४॥ मग देव म्हणे तूं काय नेणसी । जरी प्रीतीनें आम्हां पुससी । तरी आइकें गा च्छिती ऐसी । उघडचि बोलों ॥५॥ तरी नाथाचा हात ईचा शिरीं । यालागीं ते सत्यसनातन अवधारी । महाकल्पाचा अवश्वरीं । हे सोडील देह ॥६॥ तंववरी तिचें शरीर । अभंग चिरकाळ निरंतर । महद्‌माया योगिणी साचार । मुक्ताबाई उद्धवा ॥७॥ देवगन बैसोनि विमाना । गेले आपुलिया भवना । सकळ महामुनि स्थाना । हरिचराणा वंदोनि ॥८॥ म्हणती ज्ञानदेवाच्या प्रसादें । देखिली विठठल चरनारविंदें । रुप पाहातां डोळ्या दोंदें । निघति स्वानंद सुखाचीं ॥९॥ तरी ज्ञानदेव हा पायाळ जाण । निवृत्तिदेव तोचि अंजन । सोपान तो नयन । तेथिचे सिखप्राप्ती ॥१०॥ ऐसें करुनि साधन । साधिलें श्रीविठ्ठल निधान । तेथिचे विभागीं ज्याचें भाग्य पूर्ण । तींही प्रत्यक्ष देखिलें ॥११॥ या निधानासी कुरवंडी । मुक्ताबाई देह भावाची सांडी । मग उभविली गुढी । आनंदाची सर्वकाळ ॥१२॥ नामा म्हणे पंढरीसी । चालिले ह्रषिकेशी । भक्ताचि मांदी देवासरीसी । नाम घोष गर्जत चालिले ॥१३॥