भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवेपणें बरवा बाप मदनाचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव

baravepanen barava bap madanacha | to svami amucha pandharirav

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बरवेपणें बरवा बाप मदनाचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥१॥ उदारपणें उदार दाता त्रैलोक्याचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥२॥ झुंझार आणि शूर अरी त्या दैत्यांचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥३॥ चतुरपणें चतुर बाप ब्रह्मयाचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥४॥ पवित्रपणें पवित्र उद्धार तीर्थांचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥५॥ नामा म्हणे आधार सकळां जीवांचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥६॥