भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाप संतसभा भली । बहुता पुण्यें जोडिली

bap santasabha bhali | bahuta punyen jodili

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाप संतसभा भली । बहुता पुण्यें जोडिली । ह्रदयींची गोवी आपुली । संताप्रति निवेदीन ॥१॥ आजि प्रसंग हरिभक्तीचा । हरि स्वभावें उच्चारु वाचा । विठोबा ऋणिया रे भक्तांचा । ऋण फेडितो भक्तांचें ॥२॥ अरे हा अनादिचा लागु करी । अरे जन्माची उभरी भरी । आमुचा लागिया श्रीहरी । दो उत्तरीं निवडावा ॥३॥ आतां असो हा कर्मविभागु । आम्ही मागूं आपुला लागूं । जरि हा म्हणेल निःसंगु । तयासी आम्हांसी संबंध कायसा ॥४॥ जरि हा न लगे आमुचें ऋण । हातीं घेऊनि सुदर्शन । आम्ही करूं हरिकीर्तन । तेथें तिष्ठत कां उभा ॥५॥ मागें चाळविलि या रिति । परि आम्हांसि आलिया प्रचीति । ज्यासि हरिची सोय संगती । तयासि न मनें अन्य स्थळ ॥६॥ हरि कौसाळ मल्ल म्हण्ती । ते अवघी रे जाणाची भ्रांति । सेवा हरिची सांगताती । संत होती हरिकडे ॥७॥ आणिक एकू आम्हांसी आठवलें । आम्ही भांडूकरे एकले । आमुचें केलें काय चाले । य हरिभक्तां वांचूनि ॥८॥ जे हरिभक्ति विरहित । त्यांचें हरिचरणीं न बोधो चित्त । अवघे मिळूनि हरिचे भक्त । हरि व्हावा म्हणताती ॥९॥ आणिक एक नवल परि । जो याची सेवा करी । त्याचें सर्वस्व हरी । आणि श्रिहरि नाम मिरवतु ॥१०॥ हरि आळवितां मागा उभा । आठवितां पुढें उभा । हरि ध्यातां ह्रदयीं उभा । हें तंव सभा विचारा ॥११॥ आमुचें हो तेंच तुम्हीं विनवावें । आम्हांसि मानलें आघवें । किती येरझारीं शिणवावें । शरण रिघावें श्रीहरी ॥१२॥ विश्व श्रीहरिचें आघवें । म्यां गार्‍हाणें कवणाशीं द्यावें । लागे तासिच मागावें । हरिविण ठावो नसे वो ॥१३॥ वीरराया पंढरीनाथा । आतां अपंगावें शरणागता । जरी उपेक्षिसी सर्वथा । वाट कोणाची पहावी ॥१४॥ नको नको निंदा स्तुति । हाचि भावो हेचि भक्ति । मज नेदी पुनरावृत्ति । विष्णुदास म्हणे नामा ॥१५॥