भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाप आर्तबंधु सकळ जीवनकंदू । भक्तांचा सुखसिंधु पंढरिरावो

bap artabandhu sakal jivanakandu | bhaktancha sukhasindhu pandhariravo

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाप आर्तबंधु सकळ जीवनकंदू । भक्तांचा सुखसिंधु पंढरिरावो ॥१॥ हर्षे निर्भर चित्तीं आले निजभुवना । सांगे विवंचना रुक्माईसी ॥२॥ धन्य दिवस जाला आजि सोनियाचा । सोहळा भक्तांचा आरंभिला ॥३॥ प्रार्थिलें ब्राह्मणां भोजनालागुनी । येताती सारोनि स्नानविधी ॥४॥ आजीचें कवतुक पाहावें अभिन्न । हांसोनियां देव बोलते जाले ॥५॥ तंव म्हणे रुक्माई अहो जी पूर्णकामा । स्वामी मेघश्यामा कृपानिधी ॥६॥ त्यांचें पूर्व पुण्य आजि आलें फळा । देखिले गोपाळा चरण तुमचे ॥७॥ तंव ते नित्य नेम सारोनि आपुले । वेगीं द्विज आले राउळांगणा ॥८॥ नमस्कारुनि देवें बैसविलें आसनीं । पूजा चक्रपाणि आरंभिली ॥९॥ चरण प्रक्षाणुनी गंध तुळसीमाळा । घातलिया गळां ब्राह्मणाच्या ॥१०॥ उजळोनि दीपक ओंवाळिले प्रीति । मग ते पात्रपंक्ति मांडियेल्या ॥११॥ रत्नजडित सकळां सुवर्णाचीं ताटें । षड्रस बरवंटे तयामाजीं ॥१२॥ विस्तारोनि वेगीं ओगरिलीं चांगें । संकल्प श्रीरंगें सोडियेला ॥१३॥ देउनि आपोशन अमरचूडामणी । प्रार्थितो जोडोनि करकमल ॥१४॥ कवळोकवळी घ्यावें नाम अच्युताचें । भोजन भक्ताचें सुखरुप ॥१५॥ ऐसे जेविले आनंदे धाले परमानंदें । मुखशुद्धि गोविंदें समर्पिली ॥१६॥ रत्नाचे दीपक उजाळोनि आरती । साष्टांग श्रीपति नमस्कारिलें ॥१७॥ जोडोनि दोन्ही कर विनवितो श्रीरंग । आजीचा प्रसंग पुण्यकाळ ॥१८॥ आम्हां तुम्हां भेटी जाल्या सुखगोष्टी । भरली सकळ सृष्टी परमानंदें ॥१९॥ अवघें संतजन आमुचे सांगाती । जेवूं एका पांती सरिसे आम्ही ॥२०॥ म्हणोनि सकळिकां पाचारिलें देवें । कवतुक अवघे पाहाती द्विज ॥२१॥ ब्रह्मादिक देव तिष्ठत पाहाती व्योमीं । वंचलों रे आम्ही भक्ति सुखा ॥२२॥ सर्वप्रेम देउनि निवविला नामा । ऐसें भाग्य आम्हां कैसें आतां ॥२३॥