भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळपणीं वर्षे बारा । तीं तुझीं गेलीरें अवधारा । तैं तूं घांवसी सैरा । खेळाचेनि विनोदें

balapanin varshe bara | tin tujhin geliren avadhara | tain tun ghanvasi saira | khelacheni vinoden

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाळपणीं वर्षे बारा । तीं तुझीं गेलीरें अवधारा । तैं तूं घांवसी सैरा । खेळाचेनि विनोदें ॥१॥ ह्मणवोनि आहेस नागर तरुणा । तवं वोळगे रामराणा । आलिया म्हातारपणां । मग तुज कैंचि आठवण ॥२॥ तुज भरलीं अठरा । मग तूं होसी निमासुरा । पहिले पंच-विसीच्या भरा । झणें गव्हारा भुललासी ॥३॥ आणिक भरलिया सात पांचा । मग होसी महिमेचा । गर्वें खिळेल तुझी वाचा । देवा ब्राह्मणांतें न भजसी ॥४॥ त्वचा मांस शिरा जाळी। बांधोनि हाडांची मोळी । लेखि-तोसि सदाकाळी । देहचि रत्न आहे माझें ॥५॥ बहु भ्रम या शिराचा रे । ह्मणे मी मी तारुण्याच्या भरें । ऐसा संशय मनाचा रे । तूं संडीं रे अज्ञाणा ॥६॥ माथवीय पडे मासोळी । ते म्हणे मी आहे प्रबळ जळीं । तैसी विषयाच्या पाल्हाळीं । भूललसिरे ग-व्हारा ॥७॥ तुज भरलिया सांठीं । मग तुझ्या हातीं येईल काठीं । मग ती अडोरे लागती । म्हणती बागुल आलारे ॥८॥ म्हणती थोररे म्हातारा । कानीं झालसि बहिरा । कैसें न ऐकसी परिकरा । नाम हरिहरांचें ॥९॥ दांतांची पाथीं उठी । मग चाववेना भाकर रोटी । नाक लागलें हनुवटी । नाम होटीं न उच्चारवे ॥१०॥ बैसोनि उंबरवटिया तळवटी । आया बाया सांगती गोष्टी । म्हणती म्हातारा बैल दृष्टी । कैसा अक्षयीं झाला गे ॥११॥ खोकलिया येतसे खंकारा । म्हणती रांडेचा म्हातारा । अझूनि न जाय मरण द्वारां । किती दिवस चालेल ॥१२॥ ऐसा जाणोनि अवसर । वोळगा वेगें सारंगधर । विष्णुदास नामया दातार । वर विठ्ठल पंढरीये ॥१३॥