भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाई मी लिहिणें शिकलें सद्‌गुरायापासीं ॥ध्रु

bai mi lihinen shikalen sad‌gurayapasin ||dhru

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
बाई मी लिहिणें शिकलें सद्‌गुरायापासीं ॥ध्रु०॥ ब्रह्मीं झाला जो उल्लेख । तोचि नादाकार देख । पुढें ओंकाराची रेख । तूर्या ह्मणावें तिसी ॥१॥ माया महतत्त्वाचें सुभर । तीन पांचाचा प्रकार । पुढें पंचविसांचा भार । गणती केली छत्तीसीं ॥२॥ बारा सोळा एकविस हजार । आणीक सहाशांचा उबार । माप चाले सोहंकार । ओळखिले बावन्न मात्रेंसी ॥३॥ चार खोल्या चार घरीं । चौघे पुरुष चार नारी । ओळखुनी सर्वांशी अंतरीं । राहिले पांचव्यापासीं ॥४॥ पांच शहाणे पांच मूर्ख । पांच चाळक असती देख । पांच दरवडेखोर आणिक । ओळखिलें दोघांसी ॥५॥ एक बीजाचा अंकूर । होय वृक्षांशीं विस्तार । शाखापत्रें फळ फुलभार । बीजापोटीं सामावे ॥६॥ कांतीण तंतूशीं काढून । वरी क्रीडा करिती जाण । शेवटीं तंतूशीं गिळून । एकटी राहे आपैसी ॥७॥ वेदशास्त्र आणि पुराणा । याचा अर्थ आणितां मना । कनकीं नगाच्या भूषणा । अनुभव वाटे जीवासीं ॥८॥ नामदेवाच्या प्रतापांत । शिरीं विठोबाचा हात । जनी म्हणे केली मात । पुसा ज्ञानेश्वरासी ॥९॥