भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्‍हवीं अनंता कोण जाणे

amhin sharanagatin kelasi sarata | yer‍havin ananta kon jane

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्‍हवीं अनंता कोण जाणे ॥१॥ वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥ चतुरा शिरोमणी अहो केशिराजा । अंगीकार तुझा केला आम्हीं ॥३॥ सहस्त्र नामें जरी जालासि संपन्न । तरी हेंहि भूषन आमुचेंचि ॥४॥ येर्‍हवीं त्या नामाची कवण जाणे सीमा । पाहें मेघश्यामा विचारोनि ॥५॥ होतासी क्षीरसागरीं अनाथाचे परी । लक्ष्मी तेथें करी चरणसेवा ॥६॥ तेहि तंव जाण आमुची जननी । तूं तियेवांचोनि शोभसी कैसा ॥७॥ तुज नाहींज नाम रूप जाति कूळ । अनादीचें मूळ म्हणती तुज ॥८॥ आम्ही भक्त तरी तूं भक्तवत्सल । ऐसा प्रगट बोल जगामाजीं ॥९॥ ऐसि आमुचेनि भोगिसी थोरीव । अमुचा जीवभाव तुझे पायीं ॥१०॥ नामा म्हणे केशवा जरि होसी जाणता । या बोला उचिता प्रेम देई ॥११॥